
सराईत गुन्हेगार जेरबंद
नारायणगाव, ता. ७ : दशक्रिया विधीसाठी कुटुंबातील सदस्य बाहेर गेल्याच्या संधीचा फायदा घेत घरफोडी करून सोन्याचे दागिने व पैशावर डल्ला मारणाऱ्या सराईत गुन्हेगारास पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा पथकाने जेरबंद केले. पोलिसांनी आरोपीकडून ५ लाख ४६ हजार ४८१ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी आकाश प्रकाश विभूते (वय ३२, राहणार फुलसुंदर अपार्टमेंट, वारूळवाडी-आनंदवाडी, ता. जुन्नर, मुळ राहणार सुपली, पो. पळशी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) याला अटक केली आहे.
आरोपी आकाश विभूते याची चोरी करण्याची पद्धत वेगळी होती. प्रथम तो दशक्रिया कोठे आहे याची माहिती घेऊन चोरीचे नियोजन करत असे. कुटुंबातील सदस्य घर बंद करून दशक्रिया विधीसाठी गेले असता तो घरफोडी करून दागिने व रोख रक्कम चोरी करत असे. आरोपीने जुन्नर तालुक्यातील गोळेगाव व निरगुडे गावच्या हद्दीत याच पद्धतीने घरफोडी करून रोख रक्कम व दागिने आदींची चोरी केली होती. आरोपीवर या पूर्वी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला व करकंब पोलिस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.