शेती कसायची तरी कोणासाठी?

शेती कसायची तरी कोणासाठी?

नारायणगाव, ता.११ : जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील टोमॅटोचा उन्हाळी तोडणी हंगाम नुकताच सुरू झाला आहे. मात्र, टोमॅटोसह कांदा, कोबी, फ्लॉवर या भाजीपाला पिकाला समाधानकारक बाजारभाव मिळत नाही. यामुळे भांडवली खर्च कसा वसूल होणार? खते, कीटकनाशके, मजूर तसेच ट्रॅक्टर आदींची देणी दिल्यानंतर कुटुंबासाठी पैसे शिल्लक राहत नाहीत. यामुळे शेती कसायची तरी कोणासाठी? असा प्रश्न टोमॅटो व भाजीपाला उत्पादकांसमोर उभा ठाकला आहे. बहुतांश बाजार समितीमध्ये अशीच स्थिती असल्यामुळे जिल्ह्यातील बळिराजा चिंताग्रस्त बनला आहे.

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजारात टोमॅटोला प्रतवारी नुसार प्रतिकिलो दोन रुपये ते आठ रुपये, फ्लॉवरला प्रतिकिलो दीड रुपया ते दहा रुपये तर कोबीला प्रतिकिलो एक रुपया ते सहा रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. येथील टोमॅटो उपबाजारात आज (ता.११) सुमारे पंधरा हजार टोमॅटो क्रेटची आवक झाली. प्रतवारी नुसार टोमॅटो क्रेटला चाळीस रुपये ते दोनशे रुपये (दोन रुपये ते दहा रुपये किलोग्रॅम) असा भाव मिळाला. तापमान वाढ झाल्याने टोमॅटो लाल होण्याचे व खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे निवड करताना दुय्यम दर्जाची लाल टोमॅटो फेकून द्यावा लागत आहे.

टोमॅटोला क्रेटला मागील महिनाभर चाळीस रुपये ते दोनशे रुपयांच्या दरम्यान भाव आहे. वाहतूक व तोडणीसाठी प्रतिक्रेट साठ ते सत्तर रुपये खर्च येतो. यामुळे सध्याच्या बाजारभावात भांडवली खर्च कसा वसुल होणार, कृषी पंपाचे वीज बिल कसे भरणार असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत.

या घटकांच्या खर्चात झाली वाढ
* मजुरी खते * बियाणे * कीटकनाशके *बांबू * सुतळी * ठिबक * मल्चिंग कागद आदींच्या खर्चात दरवर्षी वाढ होत असल्याने टोमॅटोचा भांडवली खर्च दरवर्षी वाढत आहे.


मागील तीन वर्षात भांडवली खर्चात झालेली वाढ
२०२१.........१,००,००० रुपये
२०२२.........१ लाख २५,००० रुपये
२०२३.......१ लाख ६०,००० रुपये


मागील तीन वर्षातील टोमॅटो क्रेटला (वीस किलोग्रॅम) मिळालेला भाव
२०२१...... ३० रुपये १०० रुपये.
२०२२...... १०० रुपये ते ८०० रुपये
२०२३ (मे)...... ४० ते २०० रुपये.

२ हजार ३४४.....भाजीपालाच्या डागांची आवक
२ लाख ३४ हजार जुड्या....(कोथिंबीर, मेथी व शेपू)

फरशीला उच्चांकी भाव
काकडी, वांगी, हिरवी मिरची, फ्लॉवर, कोबी,भोपळा,दोडका आदी भाजीपाल्याला प्रतवारी नुसार प्रतिकिलो पाच रुपये ते पंचवीस रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. मात्र गवार, वालवड, घेवडा या शेंगवर्गी भाजीपाल्याला प्रतिकिलो चाळीस रुपये ते साठ रुपये तर फरशीला सत्तर रुपये ते शंभर रुपयांच्या दरम्यान उंचाकी भाव मिळत आहे.


टोमॅटो तोड्याला एकरी सुमारे तीनशे क्रेट निघतात. तपमान वाढीमुळे दहा टक्के माल खराब होतो. शिल्लक टोमॅटो पैकी पन्नास टक्के दुय्यम प्रतीचा माल उरतो. प्रतवारी नुसार क्रेटला चाळीस ते १४० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. वाहतूक, तोडणी मजुरीसाठी प्रति क्रेट पन्नास ते साठ रुपये खर्च होतो. यामुळे सध्याच्या बाजारभावात भांडवली खर्चही वसूल होत नाही.
- उत्तम लेंडे, टोमॅटो उत्पादक, पिपळवंडी


तापमानामुळे टोमॅटो होतोय खराब
दरवर्षी जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील तोडणी हंगाम एप्रिल ते ऑगस्टपर्यंत सुरू राहतो. त्यानंतर नाशिक, घोटी, संगमनेर भागात तोडणी हंगाम सुरू होतो. मात्र, या वर्षी नाशिक, घोटी, संगमनेर भागात सुध्दा तोडणी हंगाम सुरू आहे. गुजरात, राजस्थान राज्यात सुद्धा टोमॅटो हंगाम सुरू आहे. तापमान वाढीमुळे टोमॅटो लाल होऊन खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे समाधानकारक भाव मिळत नाही, असे टोमॅटो व्यापारी जालिंदर थोरवे, योगेश घोलप यांनी सांगितले.


03580

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com