नारायणगावात फ्लॅटमधून 
२३ लाखांचा ऐवज चोरी

नारायणगावात फ्लॅटमधून २३ लाखांचा ऐवज चोरी

नारायणगाव, ता. १५ : येथील पुणे-नाशिक महामार्गालगत असलेल्या अपार्टमेंटमधील बंद फ्लॅटच्या दरवाजाचा कोयंडा तोडून चोरट्यांनी तीन लाख रुपयांची रोख रक्कम, सोन्याचे व चांदीचे साडेएकोणचाळीस तोळ्यांचे दागिने, असा २३ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. चोरीची घटना रविवारी (ता. १४) दुपारी झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
नारायणगावचे माजी उपसरपंच आशिष माळवदकर व जुन्नर पंचायत समितीच्या माजी सदस्या अर्चना आशिष माळवदकर यांचा येथील पुणे-नाशिक महामार्गालगत ‘ओम नमो श्री गजानन अपार्टमेंट’ हा तीन मजली बंगला आहे. यापैकी तिसऱ्या मजल्यावर आशिष हे राहतात. तर, इतर दोन मजल्यावर त्यांचे बंधू राहतात. नारायणगाव येथील मूथा मार्केटमध्ये अर्चना माळवदकर यांचे साड्या विक्रीचे दुकान आहे. रोज सकाळी दहा ते सायंकाळी आठ या वेळेत माळवदकर दांपत्य हे फ्लॅट बंद करून दुकानात जातात. नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी साडेदहा वाजता आशिष व अर्चना हे घराला व बेडरूमला कुलूप लावून नारायणगाव येथील कापड दुकानात गेले. सायंकाळी आठ वाजता घरी आले असता घराच्या मुख्य दरवाजाचे व बेडरूमचे कुलूप तोडून चोरट्यांनी बेडरूममधील दोन कपाटातील रोख रक्कम, सोन्याचे व चांदीचे दागिने, असा तेवीस लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. आशिष यांनी याबाबतची माहिती नारायणगाव पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे, सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, फौजदार सनील धनवे हे आले. सोमवारी सकाळी ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला आणले. चोरट्यांचे ठसे मिळाले आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिस पथक तयार केले आहे, अशी माहिती ताटे यांनी दिली.
दरम्यान, रविवारी दुपारी वारूळवाडी हद्दीतील सवेरा सोसायटीमधील तीन बंद फ्लॅटचा कडी कोयंडा तोडून चोरी झाली. मात्र, या फ्लॅटमधील कुटुंबीय बाहेरगावी असल्याने चोरी गेलेल्या मुद्देमालाची माहिती मिळाली नाही.

नकली दागिने घरातच
चोरट्यांनी माळवदकर यांच्या घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे व चांदीचे साडेएकोणचाळीस तोळे दागिने चोरून नेले. मात्र, कपाटात असलेले सोन्याचे व चांदीचे नकली दागिने बेडरूममधील गादीवर काढून ठेवले. सोन्याचे व चांदीचे नकली व खरे दागिने याचे चोरटे पारखी असल्याचे व चोरटे सराईत असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com