
खोडद ग्रामस्थांकडून विधवा प्रथेला मूठमाती
नारायणगाव, ता. ४ : पारंपरिक अनिष्ट प्रथांना मूठमाती देवून विधवा महिलांना सन्मानाची वागणूक मिळावी, या उद्देशाने खोडद गावच्या ग्रामसभेत विधवा प्रथा निर्मूलन ठराव एकमताने संमत करण्यात आला. या अंतर्गत या पुढे ग्रामपंचायत हद्दीत अंत्यविधीच्या वेळी विधवा झालेल्या महिलेच्या बांगड्या फोडणे, मंगळसूत्र व जोडवी काढणे, कुंकू पुसणे आदी कुप्रथा पूर्णतः बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचे ग्रामस्थांनी स्वागत केले.
बालविकास प्रकल्प अधिकारी निर्मला कुचिक यांच्या प्रमुख उपस्थितीत खोडद ग्रामपंचायतीची ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच मनीषा गुळवे होत्या. या वेळी बालविकास प्रकल्प अधिकारी कुचिक यांच्या हस्ते अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्या निर्मला थोरात, शुभांगी काळे, योगेश शिंदे, रवी मुळे, नवनाथ पोखरकर, गणपत वाळुंज, ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष रवींद्र वामन, पंढरीनाथ खरमाळे, सुदामनाना गायकवाड, सुजन घंगाळे, पंढरी थोरात, राहुल वामन, गुंडीराज थोरात, रोहिदास डोके, विशाल पानमंद आदी उपस्थित होते.
ग्रामसभेत जगदंबामाता पतसंस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, शैलेश गायकवाड, इंद्रभान गायकवाड, अशोक खरमाळे, निवृत्तीभाऊ थोरात, पानमंद, पंढरीनाथ तांबे, संजय कुचिक, शिवाजी खरमाळे, संतोष काळे, प्रदीप बेल्हेकर, गीताबाई खरमाळे, मुख्याध्यापिका नीता दळवी यांनी भाग घेऊन विधवा महिलांना सन्मानाची वागणूक मिळावी या उद्देशाने विधवा प्रथा निर्मूलन करण्याची मागणी केली. या मागणीला उपस्थितांनी एकमताने पाठिंबा दिला. या निर्णयाचे महिलांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. ग्रामसभेला महिलांची
उपस्थिती लक्षणीय होती. या वेळी विधवा महिलांना सर्व धार्मिक, सार्वजनिक कार्यक्रमात सन्मानाने व बरोबरीने सहभागी करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर प्रतीकात्मक वडाच्या रोपट्याची विधवा महिलांच्या हस्ते पूजा करून या वडाच्या रोपट्याचे वृक्षारोपण बालविकास प्रकल्प अधिकारी निर्मला कुचिक यांच्या हस्ते करण्यात आले.
आठ मार्च रोजी महिला दिनानिमित्त गावामध्ये विधवा महिलांना सहभागी करून हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमात विधवा महिलांनी त्यांच्या वेदना बोलून दाखवल्या होत्या. त्याचवेळी अनिष्ट विधवा प्रथा बंद करण्याचा निर्धार महिलांनी केला होता. त्यावर ग्रामसभेत ठरावाद्वारे शिक्कामोर्तब झाले आहे.
-मनीषा गुळवे, सरपंच
खोडद ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी ग्रामसभेत अनिष्ट विधवा प्रथा निर्मूलनाबाबत ठराव करून सामाजिक व धार्मिक बाबतीत विधवा महिलांना सन्मानाची वागणूक देण्याचा घेतलेला निर्णय दिशादर्शक आहे. या माध्यमातून खोडद ग्रामपंचायतीने इतर ग्रामपंचायतीं पुढे आदर्श निर्माण केला आहे.
-निर्मला कुचिक, बालविकास प्रकल्प अधिकारी, जुन्नर