
शेतजमिनीच्या वादातून एकावर कोयत्याने वार
नारायणगाव, ता.७ : हिवरेतर्फे नारायणगाव येथे शेतजमिनीच्या मालकीच्या वादातून कोयत्याने वार केला. या हल्ल्यात एकजण जखमी झाला आहे. याप्रकरणी नारायणगाव पोलिसांनी दोन जणांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
याप्रकरणी महेंद्र मच्छिंद्र कोकाटे (रा. हिवरेतर्फे नारायणगाव, ता. जुन्नर), सचिन मढीकर या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या हल्ल्यात परेश शांतिलाल गुंदेचा (वय ३३, रा. दरांदळेमळा, नारायणगाव, ता. जुन्नर) हे जखमी झाले आहेत.अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली. परेश गुंदेचा यांनी हिवरे तर्फे नारायणगाव येथे
शेतजमीन खरेदी केली असून या जमिनीला त्यांनी तारेचे कंपाउंड घातले आहे. हे कंपाउंड महेंद्र कोकाटे व सचिन मढीकर हे काढत होते. या वरून गुंदेचा व आरोपी यांच्यात वाद झाला.या वादातून मढीकर याने गुंदेचा यांना धरले व महेंद्र कोकाटे यांनी गुंदेचा यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात गुंदेचा जखमी झाले आहेत. याप्रकरणी गुंदेचा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नारायणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे.