
नसरापूरमध्ये रस्त्याच्या कामामुळे कोंडी
नसरापूर, ता.११ : येथील (ता.११) चेलाडी ते नसरापूर या दरम्यानच्या रस्त्यावर होत असलेल्या सिमेंटच्या कामामुळे वाहतूक कोंडी होत आहे. पर्यटक, तसेच वाहनचालकांना एक एक तास गाडीमध्ये बसून राहावे लागत आहे. यामुळे प्रवासी, नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहे. या समस्येकडे ठेकेदार, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच पोलिस काणाडोळा करीत आहेत.
नसरापूर येथे गेल्या १५ दिवसांपासून कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करत आहेत. वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका अडकत असल्याने रुग्णाच्या जीवितास धोका पोहचल्यास याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे. चेलाडी ते नसरापूर गाव या रस्त्याच्या ५०० मिटर सिमेंट रस्ता कामासाठी ८९ लाख ३ हजार ६७१ रुपये मंजूर आहेत. हे काम नसरापूर येथे सुरू असून, कामाच्या त्याच्या गुणवत्तेबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. मात्र, त्याकडे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत.
दरम्यान, ग्राम पंचायतीचे उपसरपंच गणेश दळवी यांनी ही या बाबत ग्रामपंचायतीच्या वतीने पोलिस, ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देऊन वाहतुकीचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे सांगितले.
ठेकेदाराच्या कामाबाबत शंका
नागरिकांनी रस्त्याचे काम कशा प्रकारे होणार आहे याबाबत काटछेदाचा नकाशा फलक लावण्याची मागणी देखील केली होती. मात्र तो अद्याप लावलेला नाही. वाहतूक कोंडीचे कारण देऊन काम दररोज रात्रीचे केले जाते. मात्र, वाहतूक नियंत्रण करण्यासाठी ट्रँफिक वाँर्डनची नेमणूक केली जात नाही, कामावर निरीक्षण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोणीही अधिकारी उपस्थित नसतात. त्यामुळे ठेकेदार हे काम योग्य प्रकारे करत आहे की नाही या बाबत नागरिकांना शंका आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम वेल्हे विभागाचे उपअभियंता संकपाळ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
नसरापूर येथे होत असलेल्या रस्त्याची चौकशी करून तातडीने योग्य ती कार्यवाही केली जाईल, तसेच काम सुरू असताना अवजड वाहतूक दुसऱ्या रस्त्यावरून वळवण्याबाबत राजगड पोलिसांना पत्र दिले आहे.
-अजय भोसले, कार्यकारी अभियंता दक्षिण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग
पर्यायी रस्ता लहान असल्याने अवजड वाहतूक तेथून होऊ शकणार नाही. वाहतूक नियंत्रणासाठी ठेकेदाराला वॉर्डन नेमण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांनी एक दोन दिवस साध्या कपड्यातील माणसे नियुक्त केली. परंतु त्यांना वॉर्डनचा पोशाख नसल्याने वाहतूक नियंत्रित करता येऊ शकली नाही. ठेकेदाराने तातडीने पोषाखातील होमगार्ड नेमणे गरजेचे आहे.
- सचिन पाटील, पोलिस निरीक्षक, राजगड पोलिस ठाणे
63527
Web Title: Todays Latest District Marathi News Nas22b01354 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..