
पुरणपोळी भरवून लाडक्या सर्जा-राजाचे कौतुक पुरणपोळी भरवून सर्जा-राजाचे कौतुक
नसरापूर, ता.१३ : नसरापूर व परिसरात बैलपोळा (बेंदूर) सण शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. वर्षभर आपल्याबरोबर शेतात राबणाऱ्या सर्जा-राजाला सजवून गावामध्ये मिरवणूक काढली व सांयकाळी सुवासिनींनी पुरण पोळी खाऊ घातली. बॅण्ड पथक बोलावले तर काहींनी फटाके वाजवत बैलांना ग्राम प्रदक्षिणा घातली.
ग्रामीण भागात बैलपोळा उत्साहात साजरा केला जातो. दिवसभर शेतकऱ्यांची बैलांना अंघोळ घालणे, आकर्षक रंगवणे, सजवणे यासाठी लगबग चालु होती विविध रंगांनी बैलांना सजवण्या बरोबरच वाजंत्रीसह सर्जा-राजाची मिरवणूक काढली.
नसरापूर बाजार पेठेमध्ये देखील या बैलपोळ्यासाठी आलेल्या बैलांना सजवण्याच्या विविध वस्तुमध्ये शिंगांना लावण्यासाठी शेंब्या, बाशिंगे, पायातील तोडे, चंगाळे, नवीन पध्दतीच्या मुसख्या, गळ्यातील घंटा, बेगड, पांढऱ्या रंगाच्या बैलांना रंगवण्यासाठी बिवडी, अंगावर उठवायचा छाप, बोरकडी नवीन वेसण, फुगे अशी अनेक साहित्य गेले दोन ते तीन दिवसांपासून विक्रीस उपलब्ध होते.
नसरापूरसह परिसरातील गावांमधील शेतकऱ्यांनी या खरेदीसाठी नसरापूरमध्ये गर्दी केली होती. या खरेदी केलेल्या साहित्याने बैलांना सजवून शेतकऱ्यांनी मोठ्या हौसेने दुपारच्या सुमारास वाजत गाजत बैलांची मिरवणूक काढली होती.
02579
Web Title: Todays Latest District Marathi News Nas22b01428 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..