आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर अधिकाऱ्यांची बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर अधिकाऱ्यांची बैठक
आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर अधिकाऱ्यांची बैठक

आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर अधिकाऱ्यांची बैठक

sakal_logo
By

नसरापूर, ता.११ : धांगवडी (ता.भोर) येथील सातारा महामार्गावरील उड्डाणपुलाच्या कामाबाबत आक्षेप घेत काही नागरिकांनी दोन ऑक्टोबरला भोर येथे आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी पुलाबाबत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक धांगवडी येथेच घेण्याचे प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी मान्य केले होते. त्यानुसार मंगळवारी (ता.११) महामार्ग प्रकल्प अधिकारी व इतर अधिकारी यांच्या समवेत धांगवडी फाटा येथे पाहणी व बैठक झाली. यावेळी ग्रामस्थांनी चुकीच्या भूसंपादनाची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाईची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली.

बैठकीच्या वेळी उपअधिक्षक भूमिअभिलेख भोर हे उपस्थित नसल्याने त्यांच्या उपस्थितीत पुन्हा ता.९ नोव्हेंबर रोजी पाहणीसह बैठक घेण्याचे ठरवण्यात आले. धांगवडी येथे महामार्गावर उड्डाणपुलाचे काम राजकीय दबावापोटी चुकीच्या ठिकाणी करून जोरजबरदस्तीने पुलाचे काम पूर्ण करून घेण्यात आले आहे, अशी तक्रार करत या कामाची व झालेल्या चुकीच्या भूसंपादनाची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाईची मागणी करत धांगवडी येथील केशव विष्णू तनपुरे, जगन्नाथ नथुराम तनपुरे, गोविंद कोंडिबा तनपुरे, मोहन महादेव तनपुरे व अनिल पांडुरंग तनपुरे या नागरिकांनी दोन ऑक्टोबर रोजी आत्मदहनाचा इशारा दिला होता. यावेळी भोर प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी या कामाबाबत संबंधित अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्षकामाची पाहणी करून चर्चा करण्याचे आश्‍वासन दिले. आत्मदहन आंदोलन स्थगित करण्यात येऊन महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्पसंचालक संजय कदम, नायब तहसीलदार मनोहर पाटील, पोलिस निरीक्षक सचिन पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता संजय वागज, किकवी मंडलाधिकारी मनिषा भुतकर या अधिकाऱ्यांनी धांगवडी येथे भेट देऊन ग्रामस्थांसमवेत चर्चा केली.


राजकीय दबावामुळे आमची दखल नाही
ग्रामस्थ तनपुरे यांनी धांगवडी येथे महामार्गावर गावच्या फाट्या ऐवजी उड्डाणपूल लांब अंतरावर व चुकीच्या पध्दतीने केला गेला असून, येथील भूसंपादनात देखील अनेक चुका केल्या गेल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने देखील एका ठिकाणी मंजूर असलेले रस्ते दुसऱ्या ठिकाणी केले आहेत. हे सर्व नियोजनपूर्वक ठरवून झाले आहे. याबाबत आम्ही ग्रामस्थ अनेक वर्षांपासून आवाज उठवतो आहे. मात्र, राजकीय दबावामुळे अधिकारी आमची दखल घेत नाहीत म्हणून शेवटी आम्हाला आत्मदहनाचा इशारा द्यावा लागला. त्यानंतर अधिकारी आले आहेत. मात्र ज्या विभागाकडून चुकीचे संपादन झाले आहे. ते भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी आले नाहीत. ते सुध्दा उपस्थित असावेत अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

धांगवडी ग्रामस्थांशी चर्चा केली. परंतु उपअधीक्षक भूमिअभिलेख भोर उपस्थित नसल्याने सर्वानुमते नऊ नोव्हेंबर रोजी पुन्हा पाहणीसह बैठक आयोजित करण्याचे ठरवण्यात आले
आहे.
-मनोहर पाटील, तहसीलदार
02810