
सांगवी बुद्रुकचे शेतकरी अडचणीत
नसरापूर, ता. ९ : सांगवी बुद्रुक (ता. भोर) येथील गुंजवणी नदी तीरावरील शेतकऱ्यांच्या पाच विद्युत मोटर एकाच रात्रीत चोरीला गेल्या. त्यामुळे पाण्याअभावी कांदा, गहू, ऊस, बागायती पिके सुकण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामध्ये गावामधील सुमारे ५० शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान होणार आहे.
शेतकऱ्यांनी याबाबत राजगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
गुंजवणी नदी किनारी असलेल्या सांगवी गावामधील शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्यासाठी मोटर नदी किनारी आहेत. तेथून पाणी आणून अनेक शेतकरी बागायती शेती करत आहेत. गुरुवारी (ता. ८) रात्रीच्या सुमारास सांगवी येथील शेतकरी अशोक साधू येनपुरे यांची ७.५ अश्वशक्तीची व १२.५ अश्वशक्तीची, दत्तात्रेय मारुती यांची १० अश्वशक्तीची, गोपाळ एकनाथ मसुरकर यांची १२.५ अश्वशक्तीची, भरत निवृत्ती उफाळे यांची ७.५ अश्वशक्तीची, अशा पाच मोटर एकाच रात्री चोरट्यांनी चोरुन नेल्या. बाजारात या नविन मोटरची किंमत प्रत्येकी ५० हजारांपर्यंत आहे. या पाच मोटरवर सुमारे ५० ते ६० शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान होणार आहे. अनेक शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली असून, चार दिवसात कांद्याला पाणी दिले गेले नाही; तर हे कांदा पीक वाया जाण्याची शक्यता आहे. तसेच, गहू, ऊस व इतर बागायती पिकेदेखील धोक्यात आली आहेत.
या चोरीबाबत शेतकऱ्यांनी राजगड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून, सुमारे ६० हजार रुपयांचे नुकसानाची नोंद केली आहे. या प्रकरणी पोलिस नाईक शरद धेंडे पुढील तपास करत आहेत.