
वीज वितरणच्या ॲपवर नोंदवा ऑनलाइन तक्रार
नसरापूर, ता.११ : ''''वीज ग्राहकांनी आपल्या तक्रारींची दखल घेतली जात नसेल तर तोंडी तक्रार न करता वीज वितरण कंपनीच्या ॲप ऑनलाइन, तसेच तक्रार निवारणासाठी असलेले विविध नंबर यावर तक्रार लेखी नोंदवावी,'''' असे आवाहन वीज ग्राहक तक्रार निवारण मंच पुणेचे अध्यक्ष अजय भोसरेकर यांनी केले आहे.
नसरापूर (ता. भोर) येथे अग्निहोत्र सेवा मंडळ व ग्राहक पंचायत यांच्या वतीने २४ डिसेंबर या राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या पार्श्वभूमिवर नसरापूर व परिसरातील वीज ग्राहकांच्या समस्या निवारणासाठी वीज ग्राहक तक्रार निवारण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून भोसरेकर उपस्थित होते.
कार्यक्रमात वीज ग्राहकांनी कार्यालयात तत्पर सेवा मिळत नाही, वीज मीटर रिंडीग वेळेवर घेतले जात नाही, सार्वजनिक विजेचे खांब धोकादायक झाले आहेत त्याकडे दुर्लक्ष होत आहे, वीज चोरीकडे दुर्लक्ष होते, वीज बिले चुकीची येतात, कर्मचाऱ्यांकडून पैशाची मागणी अनेक तक्रारी नागरिकांनी यावेळी केल्या. याची कनिष्ठ अभियंता संजय बेडदुर्गे यांनी नोंद घेतली.
वीज वितरणच्या कामाबाबत माहिती घ्या. कामाचे नियम जाणून घ्या. आत्ताच्या काळात सर्व ऑनलाइन माहिती मिळू शकते. त्यामुळे तुमची पिळवणूक होणार नाही तुमच्याकडे चुकीचे पैसे मागितले जाणार नाहीत.
अजय भोसरेकर, अध्यक्ष, वीज ग्राहक तक्रार निवारण मंच, पुणे
वीज वितरणचे नसरापूर विभागाचे कनिष्ठ अभियंता संजय बेडदुर्गे यांनी यावेळी बोलताना आलेल्या तक्रारी बाबत निश्चित उपाययोजना केली जाईल कोणी अवैधरीत्या पैसे मागत असेल तर त्वरित माझ्याशी संपर्क साधावा असे सांगून महावितरणच्या तक्रारी बाबत १९१२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले.
यावेळी भोर पंचायत समितीचे माजी सभापती लहूनाना शेलार, सहायक राजकुमार कदम, ग्राहकराजा मासिकाचे संपादक दिलीप फडके, अग्निहोत्र सेवा मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रेय वाल्हेकर, नसरापूर तनिष्का व्यासपीठ प्रतिनिधी वैशाली झोरे, विक्रम कदम, अग्निहोत्र सेवा मंडळाचे सदस्य व वीज तक्रारदार ग्राहक उपस्थित होते.
ग्राहक पंचायतीचे वेल्हे तालुकाध्यक्ष किरण भदे यांनी केले तर दिलीप फडके यांनी आभार मानले.
02939