
नसरापूर ग्रामपंचायतीने अतिक्रमण नियमानुकूल करावे
नसरापूर, ता.१४ : येथे (ता. भोर) महामार्गालगत असलेल्या अतिक्रमण असलेली झोपडपट्टी गेले तीन दशकांपासून आहे. येथे नोटीस देण्यासाठी आलेल्या ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी व ग्रामसेवकांना आम्ही पंचनाम्यासाठी विरोध केला नाही. चिकटवलेली नोटीस फेकून न देता तिचा आदर करून आमच्याकडे ठेवली आहे. याबाबत ग्रामस्थांनी केलेले आरोप खोटे असून, शासन निर्णयानुसार अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी अटी व शर्तीप्रमाणे आम्ही पात्र आहोत. ग्रामपंचायतीने आमचे अतिक्रमण कायम करावे, अशी मागणी झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या भोर तालुकाध्यक्ष विमल वायकर यांनी केली आहे.
अतिक्रमणाबाबत वायकर यांनी खुलाशाचे निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे कि, शासनाच्या विविध योजनेचा लाभ न देता त्यापासून वंचित ठेवून आमच्याकडे माणूस म्हणून पहा. ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आम्ही घाणीच्या साम्राज्यात वास्तव्य करत आहे. आमची लोकवस्ती असल्याने सार्वजनिक कार्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक कार्यालय म्हणून जुने पत्र्याचे उभे केलेले शेडचे पत्रे चोरीला गेल्याने लोकहितार्थ नवीन शेड उभे केले आहे. जर ग्रामपंचायतीला लोकहितार्थ प्रकल्प राबवायचे असतील तर आम्हाला समाजमंदिर बांधून द्यावे व जातीनिहाय शासकीय योजनेतून घरकुल द्यावे, अशी आमची मागणी आहे.
वास्तविक पाहता सार्वजनिक हितासाठी बांधलेले शेड अतिक्रमणातून वगळले आहे. पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात वंचित पीडित भटक्यांना आधार द्यावा, अशी अपेक्षा वायकर यांनी व्यक्त केली आहे.