
ब्राम्हणघरच्या सरपंचपदी रंजना धुमाळ
नसरापूर, ता. २१ : ब्राम्हणघर (ता. भोर) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत विठ्ठल रुक्मिणी विकास पॅनेलच्या रंजना सीताराम धुमाळ या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. त्यांनी प्रतिस्पर्धी तीन महिला उमेदवारांचा पराभव केला. इतर तीन सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत; तर चार सदस्य निवडणुकीद्वारे निवडून आले.
ब्राम्हणघर ग्रामपंचायतीसाठी विठ्ठल रुक्मिणी विकास पॅनेल विरुद्ध कांगूरमलनाथ पॅनेलमध्ये लढत झाली. सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असलेल्या सरपंचपदासाठी एकूण चार महिला रिंगणात होत्या. त्यामध्ये विठ्ठल रुक्मिणी पॅनेलच्या रंजना धुमाळ या २२७ मते घेऊन विजयी झाल्या. इतर सात सदस्यांच्या निवडीत विजया श्रावण सणस, सीताबाई सुरेश चव्हाण, गोविंद धनंजय चव्हाण हे सदस्य बिनविरोध निवडून आले. उर्वरित चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सदस्यपदी अमोल महादेव चव्हाण, अंकिता आत्माराम धुमाळ, सुधीर जयवंत गायकवाड, मनीषा प्रदीप धुमाळ, हे उमेदवार विजयी झाले.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भगवान कानडे यांनी काम पाहिले.
विजयी पॅनेलचे नेतृत्व प्रफुल धुमाळ, गोरख धुमाळ, नीलेश धुमाळ, रोहित धुमाळ यांच्यासह सर्व ज्येष्ठ नागरिकांनी केले.