
नसरापूरला सांघिक सूर्यनमस्काराचे सादरीकरण
नसरापूर, ता. १२ : ''वंदन करा सूर्याचे अन् धडे गिरवा स्वास्थ्याचे'' अशी घोषणा करत, सकाळ समुहाच्या वतीने सादर झालेल्या स्वास्थ्यम प्रश्नमंजूषा स्पर्धेचे नसरापूर येथील शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहात स्वागत केले. यावेळी सांघिक सूर्यनमस्कार केले. यावेळी प्रवेशिका घेऊन विद्यार्थ्यांनी प्रश्नमंजूषा स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्धार केला.
''सकाळ माध्यम समुहा''च्या वतीने विद्यार्थी व पालकांच्या मानसिक शारीरिक व आध्यात्मिक स्वास्थ्यासाठी सकाळ स्वास्थ्यम ही प्रश्नमंजूषा स्पर्धा १३ फेब्रुवारी ते २५ मे या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने शाळांमध्ये सामूहिक सूर्यनमस्कारांचे आयोजन केले होते. नसरापूर येथील श्री शिवाजी विद्यालयात दोनशे विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार केले येथील क्रीडा शिक्षक एस. डी. धेंडे व मुख्याध्यापक पांडुरंग फपाळे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्काराचे मार्गदर्शन केले तसेच स्वास्थ्यम स्पर्धेची माहिती दिली.
नसरापूर-माळेगाव येथील व्ही. एम. आठवले विद्यालयात देखील विद्यार्थ्यांनी शाळेच्या पटांगणात गोलाकार रचना करत सूर्यनमस्कारांचे सादरीकरण केले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका रेवती पवार, ज्येष्ठ शिक्षक विक्रम कदम यांनी विद्यार्थ्यांना सकाळच्या उपक्रमांची माहिती दिली तसेच क्रीडा शिक्षिका दीपाली धाडवे यांनी सूर्यनमस्कारांचे आरोग्यातील महत्त्व सांगत सूर्यनमस्कार करून घेतले.
03130