स्थानिकांची टोलवसुली २४ तासात बंद करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्थानिकांची टोलवसुली २४ तासात बंद करा
स्थानिकांची टोलवसुली २४ तासात बंद करा

स्थानिकांची टोलवसुली २४ तासात बंद करा

sakal_logo
By

नसरापूर, ता. १७ ः खेड शिवापूर टोल नाक्यावर स्थानिकांकडून होणारी टोलवसुली २४ तासात बंद न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलनासाठी रस्त्यावर उतरेल, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी भोर तालुक्यातील दौऱ्यामध्ये पत्रकारांशी बोलताना दिला.
भोर तालुक्यातील महामार्ग पट्ट्यातील वरवे व शिवरे या गावी सुळे या विविध विकास कामांचे उद्‍घाटन व शिवरे गावातील रस्त्याच्या प्रश्नावरील बैठकीस उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित पत्रकारांनी टोल नाक्यावर अरेरावीने स्थानिकांकडून होत असलेल्या टोल वसुलीबाबत प्रश्न विचारला असता सुळे म्हणाल्या, ‘‘याबाबत मला माहीत मिळाली आहे. मी फोन करून पुन्हा स्थानिकांना सवलत पुर्ववत करण्याची विनंती केली आहे. येत्या २४ तासात स्थानिकांची टोल वसुली बंद न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलनासाठी रस्त्यावर उतरेल.’’
टोल नाका हटाव संघर्ष समितीचे निमंत्रक ज्ञानेश्वर दारवटकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेचे स्वागत केले. सुप्रिया ताई आमच्या आंदोलनाच्या प्रमुख मार्गदर्शक आहेत. त्यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल आम्हाला आनंद आहे. त्यांच्या इशाऱ्याने प्रशासनास निश्चित जाग येईल आंदोलनाची वेळ आल्यास आम्ही त्यांच्याबरोबर आहोत, असे दारवटकर म्हणाले.
संघर्ष समितीचे दुसरे निमंत्रक डॉ. संजय जगताप यांनी सांगितले की, मागे खासदार सुप्रिया सुळे व आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली टोलनाक्यावर आंदोलन झाले. त्यावेळी दिलेले लेखी उत्तर टोल प्रशासन व महामार्ग प्राधिकरणाने फिरवले आहे हे योग्य नाही. दिल्ली पातळीवर जो निर्णय व्हायचा आहे तो अद्याप प्रलंबित आहे. मध्येच चालू केलेल्या टोल वसुलीबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. खासदार सुळे यांनी दिलेला इशारा योग्यच असून आम्ही त्यांच्या बरोबर आहोत.