
बसमधील रोकड चोरीप्रकरणी दोन चालकांसह तिघांना अटक
नसरापूर, ता. २० : सोने खरेदी-विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याचा कामगार मुंबई येथून मेंगलोरला (कर्नाटक) जाण्यासाठी खासगी आरामबसने प्रवास करत असताना त्याच्या बॅगमधील रोख २२ लाख रुपये चोरीप्रकरणी फिर्यादीने संशय व्यक्त केलेल्या बस साफ करणारा मुलगा व बसचे दोन चालक यांना राजगड पोलिसांनी अटक केली.
या प्रकरणी बसचालक नागेश रामा पुजारी (वय ३७, रा. कटबेल तूर, जिल्हा उडपी, कर्नाटक), दुसरा बसचालक रियाज बाबुसाहब बेटगिरी (वय ५०, रा. कौलपेट, हुबळी, कर्नाटक) व बसमधील स्वच्छता कर्मचारी सुरेश शेशा पुजारी (वय ४०, रा. ओशाबीडुब, जि. कोडगु, कर्नाटक) या तिघांना राजगड पोलिसांनी सोमवारी (ता. २०) दुपारी साडेतीन वाजता अटक केली असून, त्यांच्याकडे अद्याप चोरीमधील मुद्देमाल सापडला नसून, तपास करण्यात येत आहे.
राजेंद्र प्रकाश पवार (वय ३८, रा. मेंगलोर) या सोन्याच्या व्यापाऱ्याने राजगड पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे. त्यांचा जुने सोने लिलावात खरेदी विक्री करण्याचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे कामास असलेला कामगार स्वरूपसिंग (वय ३२, रा. राजस्थान) हा २२ लाख रुपये घेऊन मुंबई येथून मेंगलोर येथे कॅनरा पिंटो या खासगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसने (क्र. के.ए. १९ ऐ. डी. ०९६६) येत असताना त्याच्या बॅगमधील २२ लाख रुपये चोरी झाले होते. याबाबत स्वरूप सिंग याने माहिती दिल्यावर पवार यांनी राजगड पोलिस ठाण्यात येऊन या बाबत तक्रार दाखल केली होती.
राजगड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन खामगळ पुढील तपास करत आहेत.