
नसरापूरमध्ये वाहतूक कोंडी नित्याची
नसरापूर, ता. ५ ः नसरापूरमधील वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. कोंडीची समस्या सोडवण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन व पोलिस प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवत आहे. तर अतिक्रमण काढणे व पार्किंगचे पी वन, पी टू हे अद्याप कागदावरच आहे. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होणार याकडे स्थानिकांसह प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी येथील रस्त्यावर जास्त गर्दी असते. अस्ताव्यस्त वाहन पार्किंग, रस्त्यालगत बसलेले विक्रेते, वाहतूक नियोजनासाठी ट्रॅफिक वॉर्डन नसणे, पोलिसांचे दुर्लक्ष, ग्रामपंचायतीच्या वतीने कोणतेही नियोजन नाही यामुळे नसरापूरमधील रस्त्यावर वाहतूक कोंडी नित्याचीच बाब झाली आहे.
ग्रामपंचायतीकडून किमान आठवडे बाजाराच्या दिवशी मुख्य रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांची इतर ठिकाणी व्यवस्था करणे किंवा रस्त्यावर त्यांचे दुकान येणार नाही, यासाठी फक्की मारणे असे छोटे उपाय देखिल केले जात नाहीत. तर वाहतूक कोंडी होऊन लांब पर्यंत रांगा लागल्या तरी हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलिस ठाण्यातून कोणताही कर्मचारी नियंत्रण करण्यासाठी बाहेर येत नाही. यामुळे या कोंडीच्या प्रश्नाबाबत कोणालाच गांभीर्य नसल्याचे दिसते.
ग्रामसेवक विजय कुलकर्णी म्हणाले, ‘‘ग्रामपंचायत या प्रश्नावर लक्ष देत असून नोव्हेंबरमध्ये झालेल्या ग्रामसभेत रस्त्यावर येणाऱ्या दुकानदारांना नोटीस बजावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सम विषम पार्किंगसाठी पोलिस ठाण्यात प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तो तातडीने देणार आहे. या बरोबरच रस्त्याच्या दोन्ही बाजूस फक्की मारण्यासाठी देखिल कार्यवाही करण्यात येईल. पोलिस ठाण्याच्या वतीने ट्रॅफिक वॉर्डन नेमण्यात यावा, अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले
पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांच्याशी संपर्क साधला असता अतिक्रमण निघाल्याशिवाय सम विषम पार्किंग चालू होऊ शकत नाही ग्रामपंचायतीने अतिक्रमण काढण्यासाठी पोलिस बंदोबस्त मागावा तो दिला जाईल.
वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीने येथील व्यापारावर परिणाम झाला आहे. त्यासाठी रस्ता रुंदीकरण होणे हाच उपाय आहे. यासाठी येथील तरुणांनी पुढाकार घेत सर्व व्यापाऱ्यांच्या सह्या घेऊन रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूंना नऊ मीटर रुंदीकरणास संमती देत कार्यवाही करण्याचे निवेदन सर्व अधिकारी पदाधिकारी यांना दिले आहे.