
नसरापूर येथील मुख्य रस्ता होणार रुंद
नसरापूर, ता. ८ : नसरापूर ग्रामस्थांनी गावातील मुख्य रस्ता रुंदीकरणाबाबत केलेल्या मागणीनुसार भोरचे प्रांत अधिकारी यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी व ग्रामस्थ यांची बैठक भोर येथील कार्यालयात नुकतीच पार पडली. यावेळी मुख्य रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूने नऊ मीटर रुंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश प्रांत अधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिले.
नसरापूर (ता. भोर) येथील युवा व्यापारी व ग्रामस्थांनी गावातील मुख्य रस्ता चेलाडी फाटा ते लेंडी ओढा दरम्यानचा रस्ता रुंदीकरण व्हावयासाठी सर्व संबंधित अधिकारी निवेदन दिले होते. यानुसार बैठक पार पडली. यावेळी तहसीलदार सचिन पाटील, गटविकास अधिकारी किरण कुमार धनवाडे, राजगड पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन पाटील, सार्वजनिक बांधकाम वेल्हे विभागाचे अभियंता संजय सकपाळ व प्रशांत गाडे, नसरापूरचे मंडल अधिकारी श्रीनिवास कंडेपल्ली नसरापूर चे उपसरपंच संदीप कदम सदस्य नामदेव चव्हाण व ग्रामस्थ उपस्थित होते.
बैठकीत नऊ मीटर हद्दीमधील लाईटचे खांब झाडे याबाबत संबंधित विभागांना सूचना देऊन ते अन्यत्र हलवण्यात यावे रस्त्यामध्ये बसणारे पथारीवाले तसेच भाजीवाले यांना बसण्यासाठी पर्याय व्यवस्था ग्रामपंचायतीने करावी. तसेच रुंदीकरणानंतर सम विषम पार्किंगची व्यवस्था करण्यात येईल, अशी माहिती पोलिस प्रशासनाने यावेळी दिली.
कार्यवाहीनंतर देखील अतिक्रमण राहिल्यास पोलिस प्रशासन, ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभाग यांच्या संयुक्त कारवाईत अतिक्रमण काढण्यात येईल असा निर्णय यावेळी घेण्यात आला.
दरम्यान, नसरापूर ग्रामस्थांनी यावेळी सर्व सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
03187