
हरिश्चंद्री येथे पाळणा गात शिवजन्मोत्सव
नसरापूर, ता. १२ : हरिश्चंद्री (ता. भोर) येथे हनुमान तरुण मंडळ व ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ग्रामस्थांसह महिलांची कार्यक्रमास फेटे घालून उपस्थिती होती. महिलांनी पाळणा गाऊन शिवजन्मोत्सव साजरा केला.
हरिश्चंद्री गावामधील तरुणांनी एकत्र येत हनुमान तरुण मंडळाच्या माध्यमातून शिवजन्मोत्सव साजरा करताना पुणे येथील लालमहाल येथून शिवज्योत प्रज्वलित करून तरुणांनी गावामध्ये आणली. ज्योत आल्यावर शिवज्योती समवेत पालखीमधून शिवरायांच्या पुतळ्याची ढोलताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. या वेळी तरुणांबरोबरच महिला देखील भगवे फेटे परिधान करून मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. गावातील मंदिराच्या सभागृहात सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत फुलांनी सजवलेल्या पाळण्यात बालशिवाजीचा जन्मोत्सव पाळणा म्हणून साजरा करण्यात आला. जन्मा नंतर सर्व उपस्थितांना सुंठवडा व लाडू वाटण्यात आले.
या कार्यक्रमानंतर भारुडाचा कार्यक्रम घेण्यात येऊन कलाकारांनी शिवजन्मावर भारुड साजरे केले.