
टोलबाबत जिल्हाधिकारी घेणार बैठक
नसरापूर, ता. १२ : खेड शिवापूर टोलनाक्यावर स्थानिकांकडून सक्तीने टोल वसुली किंवा मासिक पास काढण्याची सक्ती चालू आहे. याबाबत कृती समितीने आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत आमदार संग्राम थोपटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी याबाबत लक्ष घालून पुढील आठवड्यात बैठक लावल्याची माहिती टोलनाका हटाव कृती समितीचे निमंत्रक ज्ञानेश्वर दारवटकर यांनी दिली.
दरम्यान, शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीने १५ फेब्रुवारी रोजी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला शिवापूर टोलनाका स्थलांतरित होत नाही, तोपर्यंत टोल वसुली तत्काळ थांबवावी, तसेच सदरच्या महामार्गाचे रोड सेफ्टी ऑडिट झाले आहे का? जपानच्या तंत्रज्ञांनी कात्रजचे बोगदे धोकादायक असल्याचे कळविले होते, त्यावर पुढे काय कार्यवाही झाली? टोलनाका स्थलांतराची जागा खासदार सुप्रिया सुळे, आमदार थोपटे व भीमराव तापकीर यांनी मे २०२२ रोजी लेखी पत्राने आपणाला सुचवली होती, त्याचे पुढे काय झाले? आयआरसीचे मानकाप्रमाणे व करारातील डिझाईनप्रमाणे १४० किलोमीटर महामार्गाचे काम झाले आहे का? असे ८ प्रश्न प्रकल्प संचालकांना कृती समितीने विचारले होते. त्यावर महामार्ग प्राधिकरणाने लेखी उत्तर देण्यास ८ दिवसांची मुदतवाढ कृती समितीकडे मागितली होती, ती रविवारी (ता. १२) संपली. तरी देखिल अद्याप उत्तर देण्यात आली नाहीत. या उलट टोलवसुली मात्र चालु केली आहे. त्यामुळे कृती समितीने देखिल आक्रमक उत्तर देण्याची तयार केली असून, आज सर्व पक्षिय नेत्यांना त्याबाबत माहिती दिली. त्यांनी कृती समितीला पाठिंबा दिला आहे. आमदार संग्राम थोपटे यांनी यावर तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क केला असून, पुढील ४ दिवसांत ही बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत ठोस निर्णय होऊन टोल वसुली बंद झाली नाही, तर आम्ही आक्रमक आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहोत, अशी भूमिका शिवापूर टोल नाका हटाव कृती समितीने घेतली आहे.