
पोलिस असल्याचे सांगून कामथडीत ज्येष्ठाला लुटले
नसरापूर, ता. १५ : कामथडी (ता. भोर) येथे दोन अज्ञात व्यक्तींनी पोलिस असल्याची बतावणी करून रस्त्यावरून जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाकडून रोख सात हजार रुपये व एक सोन्याची अंगठी, असे मिळून ३२ हजार रुपये लांबविले.
याबाबत मारुती निवृत्ती मांढरे (वय ७६, रा. कामथडी) यांनी राजगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ते मंगळवारी (ता. १४) दुपारी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास नसरापूर येथील बँक आॅफ महाराष्ट्राच्या शाखेमधून पैसे काढून घेऊन नसरापूर गावामधील रस्त्याने कामथडी गावात निघाले होते. त्यावेळी माणगंगा ओढ्याच्या पुलाच्या अलीकडे त्यांच्या मागून नसरापूर बाजूने दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांना थांबवून, ‘आम्ही पोलिस आहोत, तुम्ही कुठे निघाला आहात? तुम्हाला माहिती आहे का, इथे एक खून झाला आहे. तुमच्याकडे काय पैसे आहेत ते आमच्याकडे द्या,’ असे म्हणाले. मांढरे यांनी त्यास विरोध केला असता दोघांनी जबरदस्तीने त्यांच्या कोपरीच्या खिशात हात घालून रोख सात हजार रुपये काढले व हातातील सोन्याची अर्धा तोळा वजनाची अंगठी देखिल काढली व दुचाकीवरून पुन्हा नसरापूरच्या दिशेने पळ काढला. मांढरे वयस्कर असल्याने त्यांनी पाठलाग न करता कामथडी येथील घरी गेले व नंतर राजगड पोलिस ठाण्यात येऊन त्यांनी तक्रार दाखल केली आहे.
याबाबत पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार कमलाकर काळे हे पुढील तपास करत आहेत.