
टोलनाक्यावरील गुंडगिरीविरोधात तक्रार
नसरापूर, ता. १६ : खेड-शिवापूर टोलनाक्यावर संदीप ऊर्फ नाना कोंडे व इतर कर्मचारी आणि महिला कर्मचारीदेखील टोलवर येणाऱ्या प्रवाशांबरोबर अत्यंत उर्मट भाषेत बोलून प्रवाशांना शिवीगाळ करत अंगावर धावून जाऊन मारहाण करत आहेत. याबाबत पोलिस प्रशासनाकडून कोणतीही कारवाई आजतागायत करण्यात आलेली नसल्याचा आरोप करत दादागिरी करणाऱ्या टोलकर्मचाऱ्यांबाबत टोलनाका हटाव संघर्ष समितीच्या वतीने राजगड पोलिस ठाण्यात लेखी तक्रार देण्यात आली आहे.
खेड शिवापूर टोलनाक्यावर आतापर्यंत अनेकवेळा असे प्रकार घडले, परंतु राजगड पोलिस ठाण्याकडून याबाबत कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे टोलनाक्यावरील या गुंडप्रवृत्तीचा जोर वाढला असल्याचा आरोप देखिल तक्रार अर्जात केला आहे. या अर्जावर संघर्ष समिती निमंत्रक यांच्यासह भोर व वेल्हे तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षाच्या प्रमुखांची स्वाक्षरी आहेत. याबाबत गंभीर दखल न घेतल्यास पोलिस प्रशासना विरोधात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. राजगड पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन पाटील यांना हा तक्रार अर्ज देण्यात आला.