अल्पवयीन मुलीचे लग्न लावणाऱ्या 
१५ जणांवर गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीचे लग्न लावणाऱ्या १५ जणांवर गुन्हा दाखल

नसरापूर, ता. ८ ः मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही तिचा विवाह लावून देणे दोन्हीकडील मंडळींना चांगलेच महागात पडले आहे. राजगड पोलिसांनी कारवाई करत नवरदेव व अल्पवयीन मुलीचे आई-वडील व नातेवाईक असे १५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला.
पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम रामचंद्र राजिवडे (वय २३ रा. हारपूड ता. वेल्हा) या तरुणासोबत मुळशी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा विवाह रविवार (ता. ७) आयोजित केला होता. मुलगी अल्पवयीन माहीत असताना सुद्धा दोन्हीकडचे आई-वडील व नातेवाईक यांनी अल्पवयीन मुलीचा विवाह लावत असल्याबाबत राजगड पोलिस ठाण्यात निनावी फोन आल्यानंतर पोलिस शिपाई सचिन नरुटे, मंगेश कुंभार, प्रशांत राऊत यांनी मंगल कार्यालयात जाऊन व नवरी मुलीच्या जन्म तारखेची शहानिशा केली असता मुलगी अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले. हा गुन्हा असल्याचे संबंधितांना सांगून राजगड पोलिस ठाण्यात पोलिस शिपाई सचिन नरुटे यांनी फिर्याद दिली आहे.
या विवाह प्रकरणी नवरा मुलगा शुभम रामचंद्र राजिवडे, रामचंद्र निवृत्ती राजिवडे (वडील), सिता रामचंद्र राजिवडे (आई) रा. हारपूड, ता. वेल्हे, मामा अनिल रामभाऊ रेणुसे, मामी वैशाली अनिल रेणुसे, आकाश सुनील राजिवडे, अभिषेख रवींद्र चव्हाण, कुणाल मधुकर शिरोळे, चैतन्य रामचंद्र राजीवडे, शंतनू शिवाजी पवार, कुशाल मधुकर शिरोळे व लग्न लावणारे ब्राम्हण सुनीलकाका खासनीस तसेच अल्पवयीन मुलीचे आई, वडील, मामा, मामी व इतर नातेवाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सर्वांवर बालविवाह प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना नोटीस देण्यात आली आहे. तर अल्पवयीन मुलीला ताब्यात घेऊन तिच्या आई-वडिलांकडे सोपवण्यात आल्याची माहिती तपास अधिकारी पोलिस फौजदार संजय सुतनासे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com