
घोडगंगा कारखान्याचे वजन काटे बिनचूक ः पवार
न्हावरे, ता. १४ ः शिरूर तालुक्यातील न्हावरे येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा कारखान्याचे वजन काटे बिनचूक असल्याचा निर्वाळा वजन काटे तपासणीसाठी आलेल्या भरारी पथकातील सदस्यांनी तपासणी अहवालात दिल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष ऋषिराज पवार यांनी दिली.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पुण्याचा वैद्यमापन शास्त्र विभागाच्या निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली भरारी पथकाने नुकतीच अचानक भेट देऊन कारखान्यातील वजन काट्यांची तपासणी केली असता, सदर वजनकाटे बिनचूक असल्याचा निर्वाळा भरारी पथकाने दिला. भरारी पथकाचे प्रमुख पुण्याचे वैद्यमापन विभागाचे सहायक नियंत्रक संजीव कबरे, शिरूर विभाग निरिक्षक र. ई. गवंडी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अचानक कारखान्यातील ऊस वजन काट्यांची तपासणी केली. यावेळी उसाने भरलेले ट्रक, ट्रॅक्टर व बैलगाड्यांच्या वजनाची तपासणी करण्यात आली. उसाच्या वजनासाठी वापरण्यात येत असणारे वजन काटे प्रमाणित असल्याची त्यांनी शहानिशा केली.
यावेळी वजनात कोणत्याही प्रकारची तफावत आढळून आलेली नाही. याबाबतचा अहवाल त्यांनी कारखान्यास दिला. यावेळी ऊस उत्पादक शेतकरी, ऊस वाहतूकदार तसेच कारखान्याचे चीफ इंजिनिअर व शेतकी कर्मचारी उपस्थित होते.