वळती परिसरात पावसाने नुकसान रस्ते, पिके गेली वाहून; पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वळती परिसरात पावसाने नुकसान
रस्ते, पिके गेली वाहून; पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी
वळती परिसरात पावसाने नुकसान रस्ते, पिके गेली वाहून; पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी

वळती परिसरात पावसाने नुकसान रस्ते, पिके गेली वाहून; पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी

sakal_logo
By

निरगुडसर, ता. २१ : आंबेगाव तालुक्यातील वळती परिसरात शुक्रवारी (ता. २१) पहाटे तीन तास पडलेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते, पिके वाहून गेली आहेत. परिणामी, परिसरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच सुंबरजाई-भागडेश्र्वर डोंगर परिसरात कांदा रोपे, सोयाबीनसह तरकारी पिकांचे नुकसान झाले आहे. शेताचे बांध वाहून गेले असून, तातडीने पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी वळती येथील सामाजिक कार्यकर्ते धोंडिभाऊ भोर, सरपंच आनंद वाव्हळ, विनायक लोंढे, बाबाजी भोर, रवींद्र भोर आदी शेतकऱ्यांनी केली आहे.

परतीच्या पावसामुळे शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झाला आहे. हजारो, लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी पिके उभी केली आहेत. परंतु, सततच्या पडणाऱ्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. शुक्रवारी पहाटे दोन वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत मुसळधार पाऊस झाल्याने येथील बबडी ओढ्याला पूर आला. त्यामुळे दहा शेतकऱ्यांच्या घरात पुराचे पाणी घुसून नुकसान झाले आहे.

पहाटे चार वाजण्याच्या सुमारास येथील ओढ्याला मोठा पूर आल्यामुळे ओढ्याच्या पात्रातील पाणीसाठ्यात मोठी वाढ होऊन पाणी शेजारील वस्तीमधील घरांमध्ये शिरले. येथील शेतकरी सुरेश सखाराम भोर यांच्या राहत्या घरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरून साहित्य भिजले. तर शेजारील शांताराम सुका भोर, बाळासाहेब हरिभाऊ भोर यांच्या घरात पाणी शिरून साहित्य भिजले. बबडी मळ्यात दहा शेतकऱ्यांची वस्ती असून, शेजारून ओढा वाहत आहे. यापूर्वी काही शेतकऱ्यांनी ओढ्याच्या पात्रात अतिक्रमण केल्याने ओढ्याचे पात्रच सध्या राहिले नाही. त्यामुळे आता सततच्या पावसाने ओढ्यातील पाणीसाठ्यात वाढ होऊन पाणी रस्त्यावरून वाहते. यंदाच्या पावसाळ्यात तीनवेळा पाणी घरांसमोरून वाहिले.

आदेशावर निर्णय नाही
येथील नागरिकांनी ओढ्यातील अतिक्रमण काढण्यासंदर्भात तंटामुक्त समिती, गटविकास अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे अर्ज दिला होता. त्यावर तहसीलदारांनी मंडलाधिकाऱ्यांना पाहणी करण्याचे आदेश दिले होते. परंतु, त्यावर कुठल्याही प्रकारे निर्णय घेण्यात आला नाही.