चर खोदल्यामुळे बटाट्याचे २० टन उत्पादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चर खोदल्यामुळे बटाट्याचे २० टन उत्पादन
चर खोदल्यामुळे बटाट्याचे २० टन उत्पादन

चर खोदल्यामुळे बटाट्याचे २० टन उत्पादन

sakal_logo
By

निरगुडसर, ता. ११ : निसर्गचा लहरीपणा... प्रतिकूल हवामान... परतीचा मुसळधार पाऊस... अशा अस्मानी संकटांनी खचून न जाता नागापूर (ता.आंबेगाव) येथील प्रगतशील शेतकरी दौलत शंकर भोर यांनी सतत दोन महिने पडणाऱ्या पावसातही आपले बटाटा पीक वाचविले. यासाठी पाण्याचा निचरा होण्यासाठी दोन एकर शेताभोवती चर खोदण्याचा प्रयोग यशस्वी केला. पाणी पिकात न साचता त्याचा चरामध्ये निचरा झाला. परिणामी पीक न सडण्याचा तसेच वाहून जाण्याचा धोका टळला. यामुळे त्यांना बटाट्याचे २० टन उत्पादन मिळाले व खर्च वजा जाता थेट तीन लाख रुपयांचा निव्वळ फायदा झाला आहे.

भोर यांच्या बटाटा पिकास बांधावरच व्यापाऱ्याकडून प्रति किलो २५ रुपये बाजारभाव मिळाला. यामुळे त्यांना पाच लाख रुपयांचे थेट उत्पन्न मिळाले. आंबेगावच्या पूर्व भागातील नागापूर, रांजणी, थोरांदळे खडकी, जाधववाडी या भागातील शेतकरी हंगामपूर्व बटाट्याची लागवड करतात. या वर्षी भोर यांनी कोंबडखत, मशागत, लागवड, खते, औषधे, फवारणी, मजुरी आदींसाठी एकरी ८० ते ९० हजार रुपये खर्च करून पीक फुलविले. यामुळे चालू हंगामात भोर यांना एका पिशवीमागे १२ पिशव्यांचे गळीत मिळाले आहे. भोर यांच्या बटाटा पिकाची पाहणी मंगळवारी (ता. ८) जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे अनिल देशमुख यांनी करून कौतुक केले .

दोन एकरात २० टन उत्पादन
बियाणे : ३५०० ते ४५०० रुपये
मजुरी खते : ८० ते ९० हजार रुपये (एकरी)
बटाटा प्रति किलो : २५ रुपये


दोन एकर क्षेत्रामध्ये बटाट्याची तीस कट्टे लागवड केली होती. लागवड केलेल्या जमिनीभोवती चर खोदल्यामुळे परतीच्या पावसाचे पाणी साचले नाही. नाहीतर माझेही इतर शेतकऱ्यांप्रमाणे मोठे नुकसान झाले. पीक चांगले जोपासल्यामुळे २० टन उत्पादन मिळाले. त्यास प्रति किलोस २५ रुपये बाजारभाव मिळाला.
- दौलत भोर, बटाटा उत्पादक, नागापूर (ता.आंबेगाव)


विहीर व बोअरच्या पाणीसाठ्यात वाढ
शेताभोवती चर खोदून त्यामध्ये दगडाचे डबर टाकले आणि त्यावर मुरूम माती टाकून गाडून टाकले याचा त्यांना दुहेरी फायदा होत असून अवकाळी पावसाचे पाणी शेतात साचून न राहता पूर्णपणे निचरा होतो. यामुळे शेतातील पीक सडण्यापासून वाचते आणि निचरा झालेल्या पाण्यामुळे त्यांच्या शेतातील विहीर व बोअरचा पाणीसाठा वाढून त्या पाण्याचा लाभ पुढे पिकानाच होत आहे, असे दौलत भोर यांनी ''सकाळ''शी बोलताना सांगितले.

00481, 00480