
बाभळीची झाडे तोडल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल
निरगुडसर, ता. २८ ः नागापूरच्या (ता. आंबेगाव) हद्दीत असलेल्या शेतकरी गणपत अर्जुन भोर (रा. रांजणी ता. आंबेगाव) यांच्या मालकीची बाभळीची झाडे परस्पर तोडून नेल्याप्रकरणी सात जणांवर पारगाव कारखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ रोजी रात्रीच्या सुमारास नागापूर हद्दीतील जमीन गट नंबर ४४७ मधील बांधावरून शेतकरी गणपत अर्जुन भोर यांच्या मालकीची बाभळीची झाडे परस्पर तोडून नेली, याबाबतची फिर्याद गणपत भोर यांनी दिल्यानुसार पारगाव पोलिसांनी मधुसूदन मुरलीधर भोर, विजय कोंडाजी वाघ, धनंजय गंगाराम वाघ (सर्व रा. रांजणी कारफाटा ता. आंबेगाव), योगेश नानाभाऊ भोर (रा. नागापूर ता. आंबेगाव), सुखदेव किसन केदार, बाळू न्हनु माने (दोघे रा. मांजरवाडी ता. जुन्नर), दत्तु वसंत केवाळी (रा. चांडोली ता. आंबेगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी २ लाख ३६ हजार ५०० रुपयांची लाकडे, एक ट्रॅक्टर, लाकडे कापण्याची करवत, १०० फूट वायर, ४ लोखंडी कुऱ्हाडी असे जप्त केले आहे. पारगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. ईचके पुढील तपास करत आहे.