
पिंपरी बुद्रुक सोसायटीसाठी चुरस
नीरा नरसिंहपूर, ता. ५ : पिंपरी बुद्रुक (ता. इंदापूर) विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणूक प्रचाराने जोर धरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप पुरस्कृत पॅनेलमध्ये प्रामुख्याने लढत होत आहे. संस्थेच्या ७० वर्षाच्या परंपरेत प्रथमच निवडणुकीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. यामध्ये अप्रत्यक्ष राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यामध्येच लढत होत आहे.
पिंपरी बुद्रुक सोसायटीच्या १३ जागांसाठी निवडणूक होत आहे. यामध्ये सर्वसाधारण कर्जदार खातेदार जागेसाठी आठ, महिला राखीव दोन, अनुसूचित जाती जमाती एक, भटक्या विमुक्त जाती जमाती एक; तर इतर मागासवर्गीय एक, असे १३ जागांसाठी २६ उमेदवार निवडणूक रिंगणात आपले नशीब अजमावत आहेत. शनिवारी (ता. ७) सकाळी ८ ते ५ या वेळेत मतदान होणार आहे. पिंपरी बुद्रुक, गिरवी, टणू, गोंदी, नरसिंहपूर येथील साडेआठशे मतदार मतदान करणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत लोकनेते कै. महादेवराव बोडकेदादा पंचक्रोशी ग्रामविकास पॅनेल विरूद्ध भाजप पुरस्कृत पिरसाहेब शेतकरी विकास पॅनलमध्ये प्रामुख्याने लढत होत आहे. रोहयोचे तालुकाध्यक्ष श्रीकांत बोडके विरूद्ध नीरा भीमा कारखान्याचे संचालक संजय बोडके यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही बाजूंच्या २६ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. प्रचाराने जोर धरला असून, आपणच कसे सरस असल्याचे दाखवण्यात दोन्ही बाजूंच्या उमेदवारांकडून मतदारांना पटवण्यात येत आहे.
तालुक्याचे लक्ष
राष्ट्रवादीकडून राज्यमंत्री भरणे यांच्या माध्यमातून जिल्हा बँकेची प्रकरणे सभासदांना त्वरेने देण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. तर, भाजपकडून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे हे सततपणाने सभासदांच्या संपर्कात राहून काम करत आहेत, असा दावा केला जात आहे. त्यामुळे निवडणूक ही गावपातळीवर लढवली जात असली, तरी त्याची वातावरण निर्मिती तालुका व जिल्हा पातळीवर झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.
Web Title: Todays Latest District Marathi News Npr22b01199 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..