
बावडा- नरसिंहपूर मार्गावरील एसटी सुरू करण्याची मागणी
नीरा नरसिंहपूर, ता. १० ः बावडा- नरसिंहपूर मार्गावरील एसटी बस मागील दोन वर्षांपासून बंद आहे. तिर्थक्षेत्र श्री लक्ष्मी नृसिंह जयंती सुरू आहे. त्यामुळे भाविक व नागरिकांच्या सोईसाठी एसटी बस पुन्हा सुरु करण्याची मागणी होत आहे. कर्नाटक, आंध्रप्रदेश सह राज्यातील भाविकांची येण्याची व जाण्याची सोय होणार आहे.
नीरा नरसिंहपूर येथील तिर्थक्षेत्र श्री लक्ष्मी नृसिंहाच्या जयंती महोत्सवाला मोठ्या दिमाखात सुरूवात झाली आहे. कोरोनाच्या दोन वर्षांच्या कार्यकाळानंतर प्रथमच यात्रा भरली आहे. तसेच तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातील काही कामे पूर्णत्वाच्या मार्गावर असल्याने तीर्थक्षेत्राला मूर्त स्वरूप प्राप्त होऊ लागले आहे. परंतु, अद्यापही बावडा नरसिंहपूर मार्ग पूर्ण होऊ शकला नाही.
बावडा- नरसिंहपूर मार्गावरील इंदापूर आगाराची एसटी बस मागील दोन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे खासगी वाहतूकदार ग्राहक व भाविकांची अडवणूक करून पैसे लाटत आहेत. नरसिंहपूर येथील संगमावर विविध विधी करण्यासाठी दररोज भाविक येत असतात. पण त्यांना येथे येण्यासाठी जादा पैसे मोजावे लागतात. त्यामुळे तिर्थक्षेत्र श्री लक्ष्मी नृसिंहाला येण्यासाठी बावडा नरसिंहपूर मार्गावरील एसटी बस पुन्हा सुरु करण्याची मागणी देवस्थान समिती, ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी संबंधितांकडे केली आहे. किमान सध्याच्या जयंतीच्या कालावधीत तरी एसटी बस सुरू करावी अशी मागणी केली जात आहे. राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी याबाबतचे आदेश एसटी महामंडळाला द्यावेत.
Web Title: Todays Latest District Marathi News Npr22b01205 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..