
नृसिंहाच्या आशीर्वादानेच २०१४ चे मुख्यमंत्रिपद
नीरा नरसिंहपूर, ता. २०ः नृसिंहाच्या आशीर्वादामुळे मला २०१४ साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळेस नीरा नरसिंहपूर तीर्थक्षेत्र विकासासाठी २६४ कोटींचा आराखडा तयार केला. त्यातील बहुतांश कामे पूर्णत्वास गेली आहेत, याचे समाधान असल्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
नीरा नरसिंहपूर (ता. इंदापूर) येथे आयोजित स्वागत सभेत ते बोलत होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार राहुल कूल, आमदार राम सातपुते, पृथ्वीराज जाचक, वासुदेव काळे, गोविंद देवकाते, शरद जामदार, शकील सय्यद, उदयसिंह पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, मंदिराच्या आतील काम, शिखर, पूल, बंधारे, पर्यटन स्थळ, भक्तनिवास यांचे काम अतिशय चांगले झाले आहे. बिडकर ओवरीचे सुरू असलेले काम प्राचीन ढाचा न बदलता केले जात आहे. येथे सुरू असलेल्या कामात कोणीच अडथळा आणणार नाही, याचा मला विश्वास आहे. कारण लक्ष्मी नृसिंहाच्या कामांमध्ये जो कोणी अडथळा आणेल त्याला वेगळा आशीर्वाद मिळेल. सामान्य माणसासाठी आम्ही लढत राहू, असे फडणवीस म्हणाले.
यावेळी इंदापूर तालुका भाजप, ग्रामपंचायत नीरा नरसिंहपूरच्या वतीने फडणवीस यांचा सन्मान करण्यात आला. सुरुवातीस श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरामध्ये फडणवीस यांनी अभिषेक घालून प्रार्थना केली. मंदिर समितीच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
हर्षवर्धन पाटील यांचे साकडे
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, लक्ष्मी नृसिंह जसे आपले कुलदैवत आहे, तसेच इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्यांचेही कुलदैवत आहे. लक्ष्मी नृसिंहाला साकडे घालतो की आपणास पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करावे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला आपल्या काळात दिलेली मंजुरीची कामे दिसत आहेत. परंतु निधी देण्यास अडथळा केला जात आहे.
NPR22B02464
Web Title: Todays Latest District Marathi News Npr22b01225 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..