ऊस वाहतूकदारांना आर्थिक फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऊस वाहतूकदारांना आर्थिक फटका
ऊस वाहतूकदारांना आर्थिक फटका

ऊस वाहतूकदारांना आर्थिक फटका

sakal_logo
By

नीरा नरसिंहपूर, ता. १० : राज्यातील साखर कारखान्यांचा सन २०२२-२३ चा गाळप हंगाम एक ऑक्टोबरला सुरू होईल, या अपेक्षेने ऊस वाहतूकदारांनी एक महिन्यापूर्वीच ऊसतोडणी करणाऱ्या मजुरांना कारखाना कार्यक्षेत्रात आणून ठेवले. परंतु मजुरांचा सांभाळ करताना ऊस वाहतूकदारांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

मंत्री समितीच्या बैठकीत गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने ऊसतोडणी वाहतुकीचे काम करणाऱ्या वाहतूकदारांवर ऊसतोडणी करणाऱ्या मजुरांना सांभाळण्याची वेळ आली आहे. एका ट्रॅक्टरवर साधारणपणे दहा कोयते काम करतात. एक स्त्री व एक पुरुष मिळून एक कोयता होतो. एक कोयता म्हणजे २० मजूर व त्यांची मुले मिळून सुमारे ३० लोकांचा सांभाळ करण्याची वेळ आली आहे.
सध्याच्या २०२२-२३ च्या गाळप हंगामात सर्वच साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात उसाची उपलब्धता मोठ्या प्रमाणात आहे. राज्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम ता. १ ऑक्टोबरला सुरू होईल, असे ऊसतोडणी वाहतुकीचे काम करणाऱ्या ऊस वाहतूकदारांना वाटत होता. मात्र गाळप उशिरा सुरू करण्याचा निर्णय मंत्री समितीत घेण्यात आला.

ऊसतोड मजूर उसाचे वाढे विकूनही आपला संसार प्रपंच चालवतात. पण कारखाने सुरू व्हायला जवळपास दीड महिना लागल्याने ट्रॅक्टर मालक, मुकादम, ऊसतोड मजुरांचे मात्र सर्वस्वच पणाला लागले.

मजुरांवर डोळ्यांत तेल घालून पहारा
ऊसतोडणीचे काम बंद असल्यामुळे या मजुरांना किराणा व धान्याची मोफत व्यवस्था करून द्यावी लागत आहे. तसेच मजुरांची पळवापळवी करण्यासाठी इतर साखर कारखान्यांच्या परिसरातील ऊस वाहतूकदार प्रयत्न करीत असतात. काही ऊस वाहतूकदार मुकादमांच्या संपर्कात असतात. ऊसतोडणीचे काम बंद असल्यामुळे मुकादामांची देखील चलबिचल चालू असते. त्यामुळे कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आणून ठेवलेल्या ऊसतोडणी करणाऱ्या मजुरांवर डोळ्यांत तेल घालून पहारा करण्याची वेळ आली आहे.

उपासमारीला तोंड देण्याची वेळ
कारखाने सुरू व्हायला वेळ असल्याने निवांत असणारे पण पैशाची गरज असणारे ऊसतोड मजूरांना शेतकरी कमी मजुरीत राबवून शेतातील कामे उरकून घेत आहेत. त्यामुळे स्थानिक मजुरांच्या हाताला काम नसल्याने उपासमारीला तोंड देण्याची वेळ आली आहे. पण मात्र कारखाने सुरू झाल्यावर आमचीच गरज लागणार असल्याने तेव्हा आम्ही बघूच असे स्थानिक मजुरांनी सांगितले.

02802