
सराटीच्या सत्तेची चावी भाजपकडे
नीरा नरसिंहपूर, ता. २१ ः सराटी (ता. इंदापूर) ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजप पुरस्कृत पॅनेलच्या अनिसा अमिर तांबोळी या सरपंचपदी विजयी झाले. तसेच भाजप पुरस्कृत पॅनेलचे सहा उमेदवार विजयी झाले. तर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनेलचे तीन उमेदवार विजयी झाले.
सराटी ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत जनतेतून सरपंच व नऊ जागेसाठी निवडणूक घेण्यात आली. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे यांच्या नेतृत्वाखालील भाजप पुरस्कृत पॅनेल व इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलमध्ये सरळ व चुरशीची लढत झाली. त्यामध्ये भाजप पुरस्कृत पॅनेलचे सहा तर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनेलचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत.
जनतेतून थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत भाजपच्या अनिसा अमिर तांबोळी (७७४) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शोभा लक्ष्मण गिरी (७०९) यांचा ६५ मताने पराभव केला. तर नऊ जागेसाठी झालेल्या निवडणुकीत सरळ लढत झाली. त्यामध्ये सुधीर प्रकाश कोकाटे, प्राजक्ता सुनील खरात, सुप्रिया अभिजित जगदाळे, अण्णा मधुकर कोकाटे, रोहीत युवराज जगदाळे, सुरेखा अंकुश कोकाटे, संतोष त्रिंबक कोकाटे, विमल किसन गिरी, स्वाती रमेश कोकाटे हे उमेदवार विजयी झाले आहेत.
सराटी गाव बावडा पोलिस दुरक्षेत्राच्या अंतर्गत येत असून अतिसंवेदनशील म्हणून ओळखले जात आहे. त्यामुळे निवडणुकीत पोलिसांचा बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. कोणत्याही प्रकारचे गालबोट न लागता निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात आली. निकाला नंतर विजयी मिरवणूक काढण्यास बंदी घालण्यात आली असल्यामुळे गावात सर्वत्र शांतता दिसून आली.
3006