
सुरवड दफनभूमीतील अतिक्रमणांकडे दुर्लक्ष
नीरा नरसिंहपूर, ता. २० : सुरवड (ता. इंदापूर) येथील मुस्लिम दफनभूमीवर धनदांडगे व नोकरदारांनी अतिक्रमण करत घरे बांधली आहेत. सदरचे अतिक्रमण काढण्यासाठी वरिष्ठांचे आदेश होऊनही ग्रामपंचायत चालढकल करत त्यांना पाठीशी घालत आहेत. त्यासाठी सरपंच व ग्रामसेवकासह चालढकल करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी वजीर मुबारक मनेरी व मुस्लिम समाज बांधवांनी केली आहे.
सुरवड ग्रामपंचायतीच्या गायरान गट नंबर ३०५ मधील २० गुंठे क्षेत्र मुस्लिम दफनभूमीसाठी देण्याचा आदेश प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिला. ग्रामविकास विभागाच्या सन १९८८ तरतुदीनुसार जिल्हाधिकाऱ्यांकडील महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम २२ अन्वये दफनभूमी जागा मंजूर करण्याचा अधिकार प्रांताधिकाऱ्यांना असल्यामुळे त्यांनी २० गुंठे जागा मंजूर केलेली आहे.
सुरवड येथील सदर जागेमध्ये मागील २० ते २५ वर्षांपासून दफनविधी करण्यात येत आहेत. त्यामध्ये जुन्या ५ ते ७ कबरीसह २५ ते ३० कबरी आहेत. परंतु, दफनभुमीलगत अतिक्रमण करून कच्च्या विटांचे बांधकाम तीन फुटांपर्यंत केले आहे. याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), गटविकास अधिकारी इंदापूर यांनी लेखी सूचना करूनही त्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही. तसेच, गटविकास अधिकाऱ्यांसमोर झालेल्या सुनावणीत सरपंच व ग्रामसेवक यांनी १० जानेवारी २०२३ पर्यंत सदर अतिक्रमण काढून हद्दी निश्चित करून देण्याचे म्हणण्यात मान्य केले. परंतु, त्यानंतर त्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे ग्रामसेवकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे पत्र गटविकास अधिकारी यांनी देवूनही अतिक्रमण काढण्याची कारवाई केली नाही.
दरम्यान, याबाबत सरपंच व ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता झाला नाही.
यासंदर्भात कडक व अंतिम निर्णय घेतला जाईल. तसेच, ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९ प्रमाणे ग्रामसेवकांवर महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा शिस्त नियम १९६४ प्रमाणे शिस्तभंगाची कारवाई तातडीने करण्यात येईल. यामध्ये कोणतीही हयगय केली जाणार नाही.
- विजयकुमार परीट, गटविकास अधिकारी, इंदापूर