
इंदापुरात ''जागरूक पालक सुदृढ बालक'' मोहीम
नीरा नरसिंहपूर, ता.२६ : ''''जागरूक पालक सुदृढ बालक" ही मोहिमे अंतर्गत इंदापूर तालुक्यात ५२३ शाळा व ४३१ अंगणवाडी अंतर्गत ० ते १८ वयोगटातील १,०८,३३८ बालकांची तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये आश्रमशाळा, दिव्यांग शाळा, शाळा, अंगणवाडी बाह्य स्थलांतरित मजुरांची बालके यांचीही तपासणी करण्यात येणार आहे,'''' अशी माहिती गटविकास अधिकारी विजयकुमार परीट व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा पोळ यांनी दिली.
इंदापूर तालुक्यामध्ये बालकांच्या आरोग्य तपासणी साठी एकूण ५८ आरोग्य पथके नेमण्यात आली आहेत. आरोग्य पथकामध्ये वैद्यकीय अधिकारी, आर.बी.एस. के डॉक्टर, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशासेविका यांचा समावेश आहे. सदर मोहीम यशस्वी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांचे मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांच्या सूचनेनुसार तपासणीचा ''सूक्ष्मकृती आराखडा'' तयार करण्यात आला आहे.
इंदापूर तालुक्यात आतापर्यंत ६१,६७० बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून ४९०७ बालके आजारी आढळून आली आहेत. आजारी बालकांपैकी ३५९३ बालकांना औषधोपचार देण्यात आलेला आहे. तसेच १२१२ या बालकांना प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये संदर्भित करण्यात आले आहे. उर्वरित १०२ बालकांना पुढील शस्त्रक्रियेसाठी उपजिल्हा रुग्णालय इंदापूर येथे संदर्भित करण्यात आले आहे. पुढील टप्प्यांमध्ये या बालकांच्या शस्त्रक्रिया करण्यात येतील. कार्यक्रमाच्या पर्यवेक्षनासाठी तालुका स्तरावर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा पोळ मॅडम, आरोग्य विस्तार अधिकारी दिलीप जगताप कार्यरत आहेत.
जिल्हा स्तरावरून अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय तिडके यांनी नुकतीच तालुक्यातील राधिका विद्यालय इंदापूर शाळेला भेट दिली. त्यांचेसोबत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक चोरमले, डॉ. अमर गायकवाड, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम को-ऑरडीनेटर व आर. बी. एस. के औषधनिर्माण अधिकारी, परिचारिका, शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रेय दडस उपस्थित होते. शाळेतील विद्यार्थ्याच्या आरोग्य तपासणीबाबत उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
तपासणी ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन
डॉ. तानाजी सावंत मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र राज्य यांच्या दृढ संकल्पनेतून सध्या १,०८,३३८ अपेक्षित बालकांपैकी ६१६७० बालकांची तपासणी पूर्ण झाली असून ४६,६६८ बालकांची तपासणी शिल्लक आहे. या शिल्लक बालकांची तपासणी ३१ मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.