
आगारप्रमुखांच्या मनमानीपणाचा प्रवाशांना मनस्ताप
नीरा नरसिंहपूर, ता. १३ : येथील (ता. इंदापूर) तीर्थक्षेत्र श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान येथे इंदापूर आगाराची अकलूजहून एकमेव एसटी बस येते. सध्या आगारप्रमुखांचा मनमानी कारभार आणि बसच्या अनियमित वारंवारितेमुळे विद्यार्थी, नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे तसेच भाविकांचे हाल होत आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांचे कुलदैवत अडगळीत पडल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे.
नीरा नरसिंहपूर येथील तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात सुरू असलेल्या कामांमुळे भाविकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेकजण खासगी गाड्यांसह एसटी बसने येतात. दशक्रिया, नारायण नागबळी, कालसर्प अशा विविध विधी येथे करण्यात येतात. त्यापाठी भाविक मोठ्या प्रमाणात दररोज येत असतात. परंतु, एसटी बसच्या अनियमितता मनमानी कारभाराचा फटका मोठ्या प्रमाणात बसत आहे.
बावडा नरसिंहपूर राज्य मार्गावरील आठ ते दहा गावांतील विद्यार्थी, नागरिक, महिला व भाविकांनी बाहेर गावी तसेच शाळा व महाविद्यालयात जाण्यासाठी अनेक वर्षांपासून एकमेव एसटी बसचा आधार घ्यावा लागतो आहे. अनेकदा तर शासकीय सुट्टीचा दिवस, शनिवार व रविवार दिवशी एकमेव असणारी एसटी बस अचानकपणे बंद करण्यात येत असल्याने विद्यार्थी, भाविक, सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत.
एसटीच्या अनियमितपणाबाबत इंदापूर आगाराचे व्यवस्थापकांना वारंवार सांगूनही या मार्गावरील एकमेव एसटी बस सतत बंद केली जाते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती देऊन एसटी कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी विनंती करण्यात येणार असल्याचे अनेक ग्रामस्थ, भाविक व नागरिकांनी सांगितले.
अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कुलदैवताला जाण्यासाठी एकमेव एसटी बस आहे. त्यातही जुन्या मोडकळीस आलेल्या, बाकडे तुटलेली, जुन्या वेळापत्रकानुसार न जाता कोणाच्याही फायद्याचा नसलेला वेळापत्रकावर धावणारी, कायमस्वरूपी बंद गाडीच्या यादीत असणारी एसटी बस आहे. सदर बाबीची कसून चौकशी करून नुकसानीस जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.
03203