
पिंपरी येथे अवैध मुरूम उत्खनन
नीरा नरसिंहपूर, ता.७ : पिंपरी बुद्रुक (ता. इंदापूर) गावातील गट नं. २४८/३, गायरान गट नं. २४६/१ मधील करोडो रुपयांचा अवैध मुरूम उत्खनन करून चोरून नेला आहे. दिवसाढवळ्या प्रशासनाच्या समक्ष राजरोसपणे सदर प्रकार सुरू आहे. याकडे प्रशासन काणाडोळा करीत असल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
नियमबाह्य बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्या व त्यांना पाठीशी घालणाऱ्या महसूल कर्मचारी, अधिकारी व पोलिस पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अश्वजित सिध्देश्वर कांबळे यांनी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सामाजिक कार्यकर्ते कांबळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी बुद्रुक येथे करोडो रुपयांचा अवैध मुरूम उत्खनन करून ओझरे ते गोंदी रस्त्यास वापरण्यात आलेला आहे. पिंपरी बुद्रुकचे तलाठी, तत्कालीन मंडल अधिकारी, तालुका दंडाधिकारी तसेच महसूल व पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बेकायदा अवैध मुरूम उत्खनन सुरू आहे.
उत्खनन करणाऱ्यांवरील राजकीय दबावापोटी व आर्थिक तडजोडीमुळे कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे. लुटूपूटूची कारवाई दाखवून वरिष्ठांच्या डोळ्यात धुळफेक करण्यात येत आहे. संबंधित व्यक्ती व कन्स्ट्रक्शन कंपनीवर अवैध गौण खनिज चोरीचे दखलपात्र गुन्हे दाखल करून उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्यात यावी. तसेच चौकशीअंती कारवाई न झाल्यास तहसील कार्यालय, इंदापूर या ठिकाणी उग्र स्वरूपाचे आंदोलन अथवा लाक्षणिक उपोषणाचा इशारा कांबळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, गृहमंत्री, महसूल मंत्री, विरोधीपक्षनेते, आमदार दत्तात्रेय भरणे, जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल, विशेष पोलिस महानिरीक्षक कोल्हापूर फुलारी, प्रांताधिकारी बारामती, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, तहसीलदार श्रीकांत पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक, पोलिस निरीक्षक पवार आदींना देण्यात आलेल्या आहेत.