
पिके, फळझाडे वाचविण्यासाठी धडपड
नीरा नरसिंहपूर, ता.२५ : सध्याला सूर्य आग ओकत असून, पारा ४३ अंश सेल्सिअस पार गेला आहे. याचा मोठा परिणाम पिके, मनुष्याबरोबरच जनावरांना बसत आहे. उन्हाच्या तीव्रतेने अंगाची लाही लाही होत आहे. इंदापूर तालुक्यात शेतकऱ्यांची पिकांबरोबर फळझाडेही वाचवण्याची धडपड सुरू आहे.
पाण्याअभावी शेतात उभ्या असणाऱ्या पिकांवरही परिणाम पहावयास मिळत आहे. शेतातील पीक जिवापाड सांभाळण्याकरीता शेतकरी धडपड आहेत. चारा पिकांना कितीही पाणी दिले तरीसुद्धा उन्हाच्या प्रभावाने पिके सुखू लागली आहेत.
जनावरांना उष्माघाताचा परिणामाने आजारी पडून दगावण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनेक पशुपालकांनी आपल्या जनावरांसाठी हवेशीर गोठे बांधले असून, पंख्यांचा वापर केला आहे. तर सकाळी व दुपारी जनावरांच्या अंगावर पाणी फवारणी, गार पाण्याचा मारा करणे, पौष्टिक आहार देणे, सकाळी व संध्याकाळी अशा वेळेतच चरायला सोडने असा दिनक्रम ठेवला आहे.
कडक उन्हामुळे विहिरी, नद्यांमधील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. सध्या पिकांना सतत पाणी देण्याची वेळ येत आहे. जर उन्हाचा पारा असाच राहिला तर पिके वाचविणे मुश्किल होणार आहे.
- अनंतराव बोडके, शेतकरी
03374