
शिरोलीत बिबट्याचा दुचाकीस्वारांवर हल्ला
ओझर, ता. ३ : शिरोली बुद्रुक (ता. जुन्नर) येथील किन्हईवस्ती येथे बिबट्याने दुचाकीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी सतर्कतेने बिबट्याला हुसकावून लावले.
शिरोली बुद्रुक येथे शुक्रवारी (ता. ३) सायंकाळी उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने तान्हाजी बोऱ्हाडे व त्यांची पत्नी मंदा बोऱ्हाडे यांच्या चालत्या मोटारसायकलवर झडप घातल्याने दोघेही रस्त्यावर पडले. बिबट्या चाल करून जात असल्याचे पाहून प्रसंगावधान राखून तान्हाजी बोऱ्हाडे यांनी मदतीसाठी हाका मारत बिबट्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला. आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी बॅटरी काठ्या घेऊन धाव घेत बिबट्याला हुसकावून लावल्याने अनर्थ टळला.
येथील अर्जुन शिराळशेठ यांच्या उसाच्या शेतात बिबट्याच्या मादीचा पिलांसह वावर असल्याचे नागरिकांनी पाहिले आहे. दोनच दिवसांपूर्वी गणेश विधाटे गव्हाच्या शेताला पाणी देत असताना बिबट्याने त्याचा पाठलाग केला होता. या परिसरात बिबट्याची दहशत पसरली असून, बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी नागरिक करत आहेत.