रांजणगावात भाविकांची गर्दी

रांजणगावात भाविकांची गर्दी

Published on

शिरूर, ता. ५ : रत्नजडित सुवर्णालंकारांनी सजलेले ‘श्रीं’चे रूप... सोनेरी वरखाचा शाही वस्त्रसाज, दूर्वा, मोगरा, गुलाब, जास्वंद व चमेलीची फुले गुंफून अर्पिलेला पुष्पहार... रंगीबेरंगी आणि सुगंधित फुलांनी सजलेला गाभारा... मंदिर परिसरात सर्वत्र सुवासिक उदबत्त्यांचा दरवळ... भजन-गीतांचा अखंड नाद... अन् ‘मोरया मोरया’चा अखंड गजर... आज संकष्ट चतुर्थीमुळे महागणपतीच्या दर्शनाची पर्वणी साधत रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे गणेश भक्तांनी गर्दी केली होती. त्यातच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने विविध पक्षांच्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांनीही दर्शनासाठी आवर्जून हजेरी लावली होती.
पहाटे पाच वाजता महागणपतीच्या अभिषेकानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. देवस्थानच्या वतीने भाविकांसाठी जलद दर्शन व्यवस्था, पिण्याचे पाण्याची सोय व दिवसभर खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले.
सकाळी सामुहिक अथर्वशीर्ष पठणाचा सोहळा पार पडला. मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात प्रगतशील शेतकरी नानासाहेब दिनकर पाचुंदकर यांच्या वतीने फुलांची आरास केली होती. झेंडू, मोगरा, जास्वंद, जरबेरा, चमेली, गुलाब या फुलांच्या सजावटीने गाभारा सजला होता. दुपारी १२ वाजता देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्‍वस्त डॉ. ओमकार देव यांच्या हस्ते महापूजेनंतर गणपतीला सोनेरी वरखाचा शाही पोशाख, सुवर्णालंकार परिधान करण्यात आले. यावेळी दर्शन रांगेतील भाविकांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली. आरतीनंतर महानैवेद्य दाखविण्यात आला. रांजणगाव येथील महागणपती भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर, उपाध्यक्ष संदीप दौंडकर, सचिव डॉ. तुषार पाचुंदकर, खजिनदार विजय देव, उद्योजक दत्तात्रेय पाचुंदकर, व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे, पांडुरंग चोरगे, हिशेबनीस संतोष रणपिसे, जनसंपर्क अधिकारी रमाकांत शेळके उपस्थित होते. रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिवसभर चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com