घाटरस्त्यांची सुरक्षा ऐरणीवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घाटरस्त्यांची सुरक्षा ऐरणीवर
घाटरस्त्यांची सुरक्षा ऐरणीवर

घाटरस्त्यांची सुरक्षा ऐरणीवर

sakal_logo
By

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात उपाययोजनांची आवश्यकता
फुलवडे, ता. ३० ः आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील पोखरी, बेंढारवाडी, काळवाडी, मेघोली, कोंढवळ, भगतवाडी, बोरघर-आवळेवाडी, कुशिरे, पिंपरी आदी घाट रस्त्यांवर सुरक्षेचे अगदी जुजबी उपाय केलेले आहेत, तर काही घाटांत अद्याप संरक्षक कठडेच नाहीत. काही ठिकाणी कठड्यांची दुरुस्ती झालेली नाही. भविष्यात एखादा अनर्थ घडण्याअगोदर प्रशासनाने योग्य त्या उपायांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.


पोखरी घाट वगळता इतर सर्व घाटरस्ते हे अरुंद, वळणावळणाचे तसेच तीव्र उताराचे असल्याने वाहन चालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते. नुकतीच गिरवली येथील डोंगरावर असलेल्या आयुका केंद्राची पाहणी करून परतत असताना विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळल्याची घटना घडली. याठिकाणी जर संरक्षक कठडे असते तर हा अपघात घडला नसता. त्यामुळे सर्वच घाट रस्त्यांवर सुरक्षिततेसाठी संरक्षक कठडे उभारण्यात यावेत, अशी मागणी जोर धरत आहे.

पश्चिम भागातील आहुपे, भीमाशंकर व पाटण खोऱ्यातील घाटरस्त्यांच्या एका बाजूला प्रचंड दरी व दुसऱ्या बाजूला वर्षागणिक ठिसूळ बनत चाललेल्या दरडी आहेत. त्यातच वृक्ष उन्मळण्याचे प्रकार दरडी कोसळण्यास आणखी हातभार लावत आहेत. दरडी कोसळल्यानंतर रस्त्यावर आलेले मातीचे ढीग दरीच्या बाजूला ढकलले जातात. पावसाळ्यात या भागात प्रचंड पाऊस पडत असल्याने डोंगर-उतारावरील लहान-मोठया धबधब्यांमुळे अनेक ठिकाणे ही पावसाळी पर्यटनाचे हॉट स्पॉट झालेले आहेत.

पोखरी घाटात दरवर्षी दरड कोसळत असून, हा घाट पावसाळ्यात प्रवास करण्यासाठी धोकादायक बनला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरती मलमपट्टी करण्यापेक्षा कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
--------------------------
धोकादायक सेल्फी पॉइंट
डिंभे धरण पाणलोट क्षेत्राच्या सुरुवातीलाच आहुपेकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेने एका ठिकाणी कोणतेही संरक्षक कठडे नसल्याने पर्यटकांचा तेथे सेल्फी पॉइंट तयार झाला आहे. सध्या धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असताना अशा ठिकाणी एखादी दुर्घटना घडू शकते, परंतु याठिकाणी देखील पर्यटकांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे पाहायला मिळत आहे.
--------------------------