
आदिवासी भागात कार्य करणाऱ्यांचा होणार गौरव
फुलवडे, ता. २७, निगडाळे (म्हतारबाची वाडी, ता. आंबेगाव) येथील सह्याद्री आदिवासी ॲग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त अनुसूचित क्षेत्रात शिक्षण, आरोग्य, रोजगार व कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आदिवासी महिलांचा सन्मान करणार असल्याची माहिती कंपनीचे संचालक सीताराम जोशी यांनी दिली.
दरवर्षी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त दुर्गम आदिवासी भागातील महिलांसाठी प्रथमच उपक्रम राबविण्यात येत असून यामध्ये प्रामुख्याने महिलांची मिरवणूक, विविध कार्यक्रम, महिलांचा गौरव तसेच खास महिलांसाठी आरोग्य शिबिरांचेही आयोजन करण्यात आले आहे.
आदिवासी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांची दखल घेऊन त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे या उद्देशाने यावर्षीपासून जागतिक महिला दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे. तरी राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांची माहिती संस्थेकडे ८६६९४२००४५ किंवा ९४२२०००२९६ या क्रमांकावर पाठवावी असे आवाहन सीताराम जोशी यांनी केले आहे.