
डिंभे खुर्द येथे आठवडे बाजारात होळीनिमित्त खरेदीसाठी गर्दी
फुलवडे, ता. ५ ः डिंभे खुर्द (ता. आंबेगाव) येथील आठवडे बाजारात होळीनिमित्त खरेदीसाठी आदिवासी बांधवांनी मोठी गर्दी केली होती.
बारा महिन्यातील बैलपोळा व होळी या दोन सणासाठी होणाऱ्या आठवडे बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते. आदिवासी भागांमध्ये होळीच्या सणाला विशेष महत्त्व असल्याने आठवडे बाजारात गूळ, डाळ, खोबरे, तेल, लाल मिरची तसेच रंगांची व पिचकाऱ्यांची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटली आहेत. होळीनिमित्त आदिवासी बांधव विविध प्रकारची नृत्ये, सोंगे, लेझीम खेळत गावातून मिरवणूक काढतात. तसेच या होळीमध्ये असणारा खांब लावण्यासाठी गावच्या पाटलांना मानाचे स्थान दिले जाते. पारंपरिक पद्धतीने वाद्यांच्या तालावर आदिवासी महिला होळीभोवती फेर धरून होळीची गाणी म्हणतात. होळीच्या दिवशी साखरेच्या गाठीला विशेष महत्त्व असल्याने प्रत्येक जण या गाठीचा तुकडा तोडून होळीत टाकत असतो.
02026