आदिवासी महिलांचे आर्थिक सक्षमीकरण गरजेचे : तळपे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आदिवासी महिलांचे आर्थिक सक्षमीकरण गरजेचे : तळपे
आदिवासी महिलांचे आर्थिक सक्षमीकरण गरजेचे : तळपे

आदिवासी महिलांचे आर्थिक सक्षमीकरण गरजेचे : तळपे

sakal_logo
By

फुलवडे, ता. ९ : ‘‘जगभरात आदिवासी समाजामध्ये महिलांचे स्थान निश्चितच वरचे आहे. आजही अनेक ठिकाणी मातृसत्ताक जीवन पद्धती आदिवासी समाजात अस्तित्वात आहे. अनुसूचित क्षेत्रातील महिला इतरांच्या तुलनेत अधिक सुरक्षित आहेत. एकीकडे समानतेच्या युगात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशावेळी आदिवासी महिलांचे आर्थिक सक्षमीकरण गरजेचे आहे.’’ असे मत आदिवासी सेवक पुरस्कारप्राप्त रवींद्र तळपे यांनी व्यक्त केले.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सह्याद्री आदिवासी ॲग्रो फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीच्या वतीने महिलांसाठी पोखरी (ता. आंबेगाव) येथील श्री. पंढरीनाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अनुसूचित क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महिलांचा गौरव कार्यक्रमात उषा होनाजी मसळे, अनुराधा सुभाष ढोले, सखूबाई गोविंद लोहकरे, अंजनाबाई सहदेव मते, सविता कोकाटे, अनिता सखाराम वाजे, भीमाबाई ज्ञानदेव भारमळ, सुमन बाळासाहेब दांगट यांना सन्मानित करण्यात आले.
यानिमित्ताने महिलांची मिरवणूक काढण्यात आली. त्यामध्ये भिवाडे (ता. जुन्नर), पोखरी (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद शाळेतील लेझीम पथकांनी कार्यक्रम सादर केले. तसेच खास महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर व महिलांचे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले.
कंपनीकडून आदिवासी क्षेत्रात महिलांसाठी रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती कंपनीचे संचालक सीताराम जोशी यांनी दिली. या प्रसंगी डॉ. गणेश शेंगाळे, डॉ. सुजाता वर्पे, ज्ञानेश्वर लोहकरे, जयराम जोशी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य डॉ. शशिकांत साळवे यांनी केले.