
महिलांनी लघु व्यवसायाकडे वळावे ः मते
फुलवडे, ता. १५ ः ‘‘महिला या आता कुठल्याच क्षेत्रात मागे नाहीत. आपल्या देशाच्या राष्ट्रपती देखील महिलाच आहेत. त्यामुळे महिलांनी कुटुंब सांभाळून लघु व्यवसायाकडे वळावे. आपल्या कुटुंबासाठी व गावच्या प्रगतीसाठी बचत गटांच्या माध्यमातून प्रयत्न करावेत,’’ असे प्रतिपादन समाजसेविका उषा मते यांनी व्यक्त केले.
आंबे (ता. जुन्नर) येथे शाश्वत ट्रस्टने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमात आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील आदिवासी महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. अध्यक्षस्थानी आंबेच्या सरपंच मंगल चिमटे होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून अडिवरेच्या सरपंच संगीता किर्वे उपस्थित होत्या.
कार्यक्रमात जांभोरी, अडिवरे, कोंढरे, भोईरवाडी, पिंपरवाडी, हातविज, चावंड, घाटघर, सुकाळवेढे येथील महिला बहुसंख्येने सहभागी झाल्या होत्या. याप्रसंगी महिलांनी लेझीम नृत्य सादर केले. संगीत खुर्ची, फुगडी, रस्सीखेच, बादलीत चेंडू टाकणे, मडके फोडणे, चमचा लिंबू, उखाणे, शिमग्याची गाणी आदी स्पर्धा पार पडल्या. विजेत्यांना पैठणी, डब्बे, बाउल बॉक्स, फोटोफ्रेम आदी बक्षीसे देण्यात आली. महिलांना आपले विचार मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे. तसेच विविध स्पर्धांमधून महिलांना आनंद मिळावा या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे शाश्वत ट्रस्टचे अध्यक्ष बुधाजी डामसे यांनी सांगितले.
स्पर्धांचे आयोजन आशा डावखर, पुष्पा शेळके, मंदा भोकटे, सुनंदा डामसे, जिजा भालचिम, कविता चिमटे, कलाबाई हेमाडे, अनिता असवले, कमल पारधी यांनी केले.