
धाडस बेततेय तरुणांच्या जिवावर
पिंपळवंडी, ता.१ : वर्षा विहारासाठी सध्या मुंबई, पुणे तसेच इतर राज्यातील पर्यटक जिल्ह्यातील पर्यटनस्थळे, धबधब्यांना भेट देत आहेत. काही अतिउत्साही तरुण-तरुणी धाडस दाखवून आनंद लुटण्याचा प्रयत्न करीत असतात. नेमके तेच धाडस त्यांच्या जिवावर बेतत आहे. काळू धबधब्यात पडून आठ दिवसांपूर्वी एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर
वनविभागाचे प्रशासन, रेस्क्यू टीम तसेच स्थानिकांच्या सूचनांकडे काणाडोळा केल्याने सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये अपघातांचे प्रमाण सध्या वाढले आहे.
जुन्नर तालुक्यात अशा घटनांचे प्रमाण अधिक आहे. रेस्क्यू टिमची मदत तसेच स्थानिकांनी प्रसंगावधान राखल्याने अपघात टळून अनेकांची सुखरूप सुटका होत आहे. प्रशासनाकडून उपाययोजना केल्या तरी पर्यटकांनी योग्य काळजी घेण्याचे आवाहन सर्वच स्तरातून केले जात आहे. अपघात घडू नयेत यासाठी कार्यशाळा घेणे तसेच बचाव कार्य करणाऱ्या संस्थांसाठी काम करणाऱ्यांच्या सुरक्षतेसाठी शासनस्तरावर उपाययोजना करण्याची मागणी पावसाळ्या होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर सर्व गिरीप्रेमी संस्थांनी केली आहे.
जुन्नर तालुक्यातील काळू धबधबा परिसरात नदीपात्रात रविवारी (ता.३१) मुंबईचे पर्यटक उतरले होते. धबधबा ज्याठिकाणी १२०० फूट खाली कोसळतो तेथे पंधरा ते वीस फूट अंतरावर पाण्यात उतरून पर्यटक वर्षा विहाराचा आनंद घेत होते. त्यावेळी पाण्याचा वेग अचानक वाढल्याने त्यातील एक तरुण व तरुणी ज्याठिकाणी खोल खड्डा आहे त्यादिशेने वाहू गेले. पण प्रसंगावधान दाखवत शिवनेरी ट्रेकर्सचे त्यांचे प्राण वाचविले.
पारगाव मंगरूळ येथील शिवनेरी ट्रेकर्सचे सदस्य सागर चव्हाण, अतुल रसाळ व स्वप्नील तट्टू हे सेफ्टी केबल लावण्यासाठी गेले असताना त्यांनी काळू नदीपात्रात जवळ असलेल्या मुंबईचे पर्यटक पात्रात न उतरण्याचा सल्ला दिला. मात्र पर्यटकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. ज्या ठिकाणी धबधबा कोसळतो तेथे खोल खड्ड्यात पडून तरुण-तरुणी वाहून जात होते. त्यावेळी रसाळ, तट्टू व सागर चव्हाण यांनी प्रसंगावधान दाखवत त्यांचा जीव वाचवला. या तरुणांनी हे धाडस दाखवले नसते तर ते पर्यटक बाराशे फूट खोल दरीत कोसळले असते व मोठा अनर्थ घडला असता.
मोबाईलच्या रेंजमुळे झाली सुटका
हैद्राबाद येथील सॉफ्टवेअर इंजिनिअर विनोद बागूल हा तरुण मुरबाड येथून जुन्नरच्या ढाकोबा या पर्वताचा सोलो ट्रेक करण्यासाठी निघाला असता रविवारी रात्रीच्या सुमारास दरीत अडकून पडला. सुदैवाने मोबाईलला रेंज आली असता त्याने महाराष्ट्र माऊंटनेरिंग रेस्क्यू संस्थेशी संपर्क साधला. यावेळी ओंकार ओक यांनी मुरबाडच्या सह्यगिरी संस्थेच्या दीपक विषे यांच्याशी संपर्क केला असता विषे व शांताराम बाम्हणे हे दोघे रात्री एकच्या सुमारास जुन्नरला आले व तेथून जुन्नर आपत्ती व्यवस्थापन टीमचे संतोष कबाडी व प्रशांत कबाडी हे सर्व बचावकार्यासाठी लागणारे साहित्य घेऊन रात्री दोनच्या सुमारास दुर्गावाडी परिसरात पोचले तेथील स्थानिक लक्ष्मण निर्मळ यांना घेऊन ते पहाटेच्या सुमारास खाली उतरले व त्या तरुणाची सुखरूप सुटका केली.
दाट धुक्यात पोलिस, स्थानिकांकडून शोध
जुन्नर तालुक्यात वर्षाविहारासाठी काळू धबधबा येथे नुकताच मुंबई येथील प्रतीक अदम हा तरुण पर्यटनासाठी एकटाच आला होता. तो पुन्हा घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबीयांनी तसेच मित्रांनी फेसबुक पोस्टाद्वारे पोलिस स्टेशनला कळवले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दाट धुके तसेच पावसाही पोलिस व स्थानिकांनी त्याचा शोध घेतला.
काळू धबधबा परिसरात प्रशांत घरत यांनी प्रतिकचा ड्रोनच्या मदतीने शोध घेतला पण त्यांना यश आले नाही. त्यामुळे मुरबाड येथील दीपक विषे व लोणावळा येथील शिवदुर्ग संस्थेचे गणेश गिध यांनी १२०० फूट खोल काळू धबधब्यात उतरून चार टप्यात प्रतिकचा शोध घेतला. जुन्नर आपातकालीन कक्षाचे रूपेश जगताप, शंकर
साबळे हे योग्य सूचना देत शोधमोहिमेवर होते. तेथील चारही टप्प्यात शोध न लागल्याने पुढे नदी पात्रात शोध घेण्यात आला. तेथे त्या तरुणाचा मृतदेह आढळून आला. या मोहिमेत माळशेज रेस्क्यू टीम, खिरेश्वर ग्रामस्थ पिंपळवंडीचे शांताराम बाम्हणे, विजय कालेकर, गणेश दिघे, कुसुम विशे, प्रमोद बोडके यांचं योगदान मिळाले.
01360, 01359
Web Title: Todays Latest District Marathi News Pln22b00813 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..