
सिंगापूर परिसरात बिबट्यांची दहशत
पारगाव मेमाणे, ता. २०ः सिंगापूर हगवणेवस्ती, उदाचीवाडी, पारगाव मेमाणे, भगतवस्ती येथे मागील दोन दिवसांमध्ये बिबट्यांची दहशत पसरली आहे. रात्री उशिरा स्थानिक शेतकरी विकास मेमाणे यांनी दोन बछडे एक मादी बिबट्या पाहिला. तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी सिंगापूर हद्दीतील कडवळाच्या शेतात दोन बछडे व शेजारील उसाच्या शेतात मादी बिबट्या शिरल्याचे सिंगापूर येथील स्थानिक शेतकऱ्यांनी पाहिले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे.
ग्रामस्थांनी बिबट्यांबाबत वनविभागास कळविले आहे. सिंगापूर हद्दीतील शेतात बिबट्यांच्या पावलांचे ठसे आढळल्याच्या वृत्तास वनविभागाकडून दुजोरा देण्यात आला आहे. मात्र, याप्रकाराने शेतकरी प्रचंड भीतीच्या वातावरणात राहत आहेत. वनपुरी, उदाचीवाडी, पारगाव मेमाणे हा परिसर वेळोवेळी बिबट्यांच्या भ्रमंतीचा भाग बनला असून, अनेकदा उपद्रव झाला आहे. त्यामुळे या भागात सातत्याने बिबट्यांचा वावर असतोच. शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी वनविभागाने पिंजरा लावणे यासारखे ठोस कार्यवाही करणे गरजेचे असल्याचे शेतकऱ्यांनी बोलून दाखविले.
दरम्यान, बछडे बरोबर असल्याने बिबट मादीबाहेर येणार नाही व क्षेत्र सोडणार नाही म्हणून नागरिकांनी सावध राहावे असे येथील वनपाल यांनी सांगितले.
पारगाव परिसरातील बहुसंख्य क्षेत्र सिंचनाखाली असल्याने उसासारख्या पिकाचे प्रचंड प्रमाण आहे. रात्री माझ्या गाडीसमोरून दहा फूट अंतरावर बिबट्याची मादी व दोन बछडे शेजारील उसाच्या शेतात गायब झाले. बिबट्याच्या दर्शनाने दैनंदिन व्यवहार ठप्प होत आहे लोकांच्या मनामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे.
- विकास मेमाणे, स्थानिक शेतकरी पारगाव