
कर्तृत्ववान महिलांवर कौतुकाची थाप
कर्तृत्ववान महिलांवर कौतुकाची थाप
‘आयडॉल आॅफ महाराष्ट्र’ पुरस्काराने गौरव; ‘सकाळ माध्यम समूहा’कडून गौरव
पुणे, ता. ३ : सामाजिक बंधने आणि विशिष्ट चौकटीत बंदिस्त राहून काम करण्याचा सामाजिक पगडा झुगारून देत विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी केलेल्या पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सावित्रीच्या लेकींच्या पाठीवर शुक्रवारी (ता. २९) ‘सकाळ माध्यम समूहा’च्यावतीने कौतुकाची थाप मारण्यात आली. ‘सकाळ’च्यावतीने या कर्तृत्ववान महिलांचा ‘आयडॉल आॅफ महाराष्ट्र’ या पुरस्काराने गौरव करण्यात आला.
नगर रस्त्यावरील ‘हयात’ हॉटेलमधील दिमाखदार सोहळ्यात ग्रामीण भागातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, कायदा, सहकार, कृषी, उद्योग, बँकिंग आणि प्रशासकीय सेवा आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कर्तृत्ववान महिलांचा खास सन्मान करण्यात आला. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील ‘वहिनीसाहेब’ अर्थात अभिनेत्री धनश्री काडगावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस आणि कार्यकारी संपादक शीतल पवार आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी आयुष प्रसाद म्हणाले, ‘‘सद्य:स्थितीत महिला सर्वच क्षेत्रात चमकदार कामगिरी करत आहेत. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, कायदा आणि उद्योग व्यवसाय या क्षेत्राबरोबरच आता भारतीय प्रशासकीय सेवेत येणाऱ्या महिलांचे प्रमाणही वाढू लागले आहे, ही चांगली बाब आहे. भारतीय प्रशासकीय सेवेच्या माझ्या २०१४ च्या बॅचमध्ये ४०-४५ टक्के महिला होत्या. हे प्रमाण आता ५० टक्क्यांवर जाणार आहे. परिणामी भविष्यात ५० टक्क्यांहून जास्त महिलांची स्पर्धा परीक्षेद्वारे प्रशासकीय सेवेत निवड होऊ शकेल. महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार हे महिला सक्षमीकरणाचे होते.’’
शीतल पवार यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या, ‘‘सकाळ माध्यम समूहाचा हा उपक्रम समाजातील महिलांच्या प्रभावाचा सन्मान आहे. स्त्री ही आई, पत्नी, बहिण अशा विविध भूमिकेत असते, तिचा सन्मान व्हावा म्हणून हा कार्यक्रम आहे. स्त्रीला कुठलीही भूमिका द्या, सातत्याने ती तिची भूमिका चोखपणे पार पाडत असते. या सत्कारार्थी महिलांमध्ये कोणी शिक्षण, शेती, उद्योग क्षेत्रात काम केलंय, त्याचा अभिमान आहे. स्त्रीच्या संघर्षाची कथा सगळेच सांगतात. पण, आपण त्यांच्या सकारात्मक कार्याकडे पाहू यात. त्याला आठवू यात. आपल्यासारखे अजून काही महिलांना उभे करता येते का, हे पाहूयात.’’
सम्राट फडणीस यांनी आभार मानले. ते म्हणाले, ‘‘समाजात घडणाऱ्या सकारात्मक व चांगल्या बाबीसुद्धा समाजापुढे याव्यात, या उद्देशाने ‘सकाळ’ने हा सन्मान सोहळा आयोजित केला आहे. चांगले काम करणाऱ्या लोकांना एकत्र करा, म्हणजे समाजामध्ये सकारात्मक बदल होतील, अशी भूमिका आहे.’’
भूषण करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले.
भारतीय संस्कृतीत महिलांना फार मोठे स्थान आहे. पण, समाजाने अद्यापही महिलांना समान विचार करण्याचे स्वातंत्र्य दिलेले नाही. त्यामुळे समाजाने महिलांना पहिल्यांदा विचार स्वातंत्र्याचे अधिकार दिले पाहिजेत. ‘सकाळ’ने या पुरस्कारांच्या माध्यमातून महिलांना एकसमान अधिकार आणि विचार स्वातंत्र्य देण्याचे काम केले आहे. त्यामुळे मी ‘सकाळ’चे अभिनंदन करतो आणि आभार मानतो.
- आयुष प्रसाद,
मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद, पुणे.
सकाळ माध्यम समूहाने हा चांगला उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात पुणे जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्याची मला संधी मिळाली, हे मी माझे भाग्यच समजते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा गौरव करणे, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणे, हे खूप चांगले काम आहे. महिलांना घरातील खूप कामे करावी लागतात. ही कामे करत करत महिला या विविध क्षेत्रातही चमकदार कामगिरी करू शकतात, हेच या कर्तृत्ववान महिलांनी दाखवून दिले आहे.
- धनश्री काडगावकर,
अभिनेत्री
Web Title: Todays Latest District Marathi News Pne22c58653 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..