
अतिवृष्टीमुळे वाहून गेलेल्या ताली, शेतीची दुरुस्ती
भोर, ता. ७ ः गतवर्षी अतिवृष्टीमुळे तालुक्याच्या पश्चिम भागात झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करूनही काही शेतकऱ्यांना अद्याप कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही. यासंदर्भातील माहिती मिळाल्यानंतर टिटेघरमधील ध्रुव प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजीव केळकर यांनी शेतीची व बांधांची दुरुस्ती करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
अतिवृष्टीमुळे भातखाचरांच्या ताली, जनावरांचे चराऊ पडरान, शेताजवळील नाले यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. पावसाळ्यापूर्वी ही कामे झाली नाहीत तर शेतात पीक घेता येणार नाही, ही बाब शेतकऱ्यांनी राजीव केळकर यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर केळकर यांनी २० दिवसांसाठी एक जेसीबी उपलब्ध करून दिला. एका गुंठ्यापेक्षा जास्त क्षेत्राची पडझड झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीची दुरुस्ती करण्यास सुरुवात केली. गावातील शंकर रावडे, बापुभाऊ नवघणे, सरपंच शंकर तावरे, सोनबा दळवी, आंनदा नवघणे, सुरेश निगडे, ज्ञानेश्वर भोईटे व राहुल खोपडे यांनी जेसीबीच्या कामाचे नियोजन केले. सद्यःस्थितीत जेसीबी दररोज ८ ते १० तास शेतीच्या दुरुस्तीचे काम करीत आहे. टेटेघरमधील १५ ते २० शेतकऱ्यांच्या १ हेक्टर क्षेत्राच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. टिटेघरमधील शेतकरी जिजाबा नवघणे, नारायण नवघणे, नारायण नवघणे, तुषार नवघणे, बाळू नवघणे व ज्ञानेश्वर सणस यांनी उपक्रमाचे कौतुक केले.
जून महिन्यात शेतकऱ्यांना मुलांचे शिक्षण, खते बी-बियाणे, घर शेकरणी, शेतीअवजारे दुरुस्ती अशा प्रकारच्या खर्चाला सामोरे जावे लागते. त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडतो. म्हणून आर्थिक दृष्टीने कमी असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीची दुरुस्ती करून देणार आहे.
- राजीव केळकर, अध्यक्ष, ध्रुव प्रतिष्ठान, टिटेघर
ID: PNE22S62167
Web Title: Todays Latest District Marathi News Pne22c60462 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..