नारायणगावातील गुन्हेगारी चिंताजनक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नारायणगावातील गुन्हेगारी चिंताजनक
नारायणगावातील गुन्हेगारी चिंताजनक

नारायणगावातील गुन्हेगारी चिंताजनक

sakal_logo
By

नारायणगाव, ता. १३ : येथील बसस्थानक चौकात हॉटेलमध्ये गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच दोन खून झाले. त्यामुळे नारायणगाव (ता. जुन्नर) परिसरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला असल्याची चर्चा सुरू आहे. वाढलेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस यंत्रणेने अधिक ॲलर्ट राहण्याची गरज आहे.
नारायणगाव येथील हॉटेल कपिल बिअर बारमध्ये मंगळवारी (ता. १०) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास दोन गटात झालेल्या वादातून चाकू व पिस्तुलाचा वापर करून दहशत निर्माण केली. या प्रकरणी पोलिसांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून फरारी झालेल्या मुख्य आरोपीसह सात जणांना गुरुवारी (ता. १२) अटक केली. अटक आरोपींमध्ये चार अल्पवयीन मुले आहेत.
इतर फरारी आरोपींचा तपास सुरू असतानाच गुरुवारी (ता. १२) येथील पुणे-नाशिक महामार्गालगत नारायणगाव पोलिस ठाण्यापासून जवळच असलेल्या ‘जयहिंद टायर वर्क्स’ या दुकानात काम करणाऱ्या मोहम्मद अब्बास या तरुणाचा त्याच्या सहकारी कामगाराने दुकानातील खोलीतच गळा आवळून खून केला. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपी बिहार या त्याच्या मूळ गावी फरारी झाला.
गोळीबार व खून या दोन्ही घटनांचा तपास सुरू असतानाच शुक्रवारी सकाळी येथील मीना नदीच्या तीरावर असलेल्या हरिहरेश्वर मंदिराजवळ संभाजी बबन गायकवाड (वय ४४, रा. येणेरे, ता. जुन्नर) याचा मृतदेह आढळून आला. गायकवाड यांच्या डोक्यावर गंभीर स्वरूपाची दुखापत झाली असून, डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्त प्रवाह झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.
१० मे २०२२ रोजी गोळीबाराची घटना झाल्या नंतर ११ मे व १२ मे २०२२, अशा सलग दोन दिवस खून झाल्याचा घटना झाल्या. दोन महिन्यांपूर्वी कावळ पिंपरी येथील तरुणाचा खून झाला होता. या घटनेतील आरोपींना गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. येडगाव धरण जलाशयात सातत्याने कृषी पंपाच्या केबल चोरीच्या घटना घडत आहेत. मोटार सायकल व इतर वाहने चोरीच्या, घरफोडीच्या घटना अधूनमधून सुरूच आहेत.

तपासात पोलिसांचे अपयश
पुणे-नाशिक महामार्गालगत असलेल्या चौदा नंबर येथील अनंत ग्रामिण सहकारी पतसंस्थेत २४ नोव्हेंबर २०२१ रोजी भर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दरोडा पडला होता. या घटनेत दोन अज्ञात सशस्त्र तरुणांनी पिस्तुलातून गोळी झाडून पतसंस्थेचे व्यवस्थापक राजेंद्र दशरथ भोर (वय ५२) यांचा खून करून पतसंस्थेची सुमारे अडीच लाख रुपयांची रक्कम लुटून नेली होती. घटनास्थळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी भेट दिली होती. मात्र, सहा महिन्यांनंतरही अद्याप या घटनेचा तपास लावून दरोडेखोरांचा शोध लावण्यात, आरोपींची नावे निष्पन्न करण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही.

पोलिसांनी घ्यावा ॲक्शन मोड
नारायणगाव ही तालुक्यातील मोठी बाजारपेठ आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतमाल खरेदी विक्रीतून रोज लाखो रुपयांची उलाढाल होत असते. टोमॅटो आवार परिसरातसुद्धा गुन्हेगारांचा वावर असल्याचे या पूर्वीच्या घटनांवरून निष्पन्न झाले आहे. एकूणच गुन्ह्याच्या घटना वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला, व्यापारी वर्ग यांच्यामधून चिंता व्यक्त होत आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचा बीमोड करण्यासाठी पोलिस यंत्रणेने ॲक्शन मोडमध्ये येऊन अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. रात्रीची नाकाबंदी करणे आवश्यक आहे. त्यासाठी रात्रीचा अधिकचा पोलिस बंदोबस्त देण्याची मागणी होत आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22c63107 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top