
एसटीची टेम्पोला धडक; १४ जखमी
मंचर, ता.२ : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर एकलहरे (ता.आंबेगाव) येथे पुण्याकडे जात असलेल्या दुधाच्या पिकअप टेम्पोला पुणे-नाशिक एसटी बसची जोरदार
धडक बसली. या भीषण अपघातात दोन्ही वाहनातील एकूण १४ जण गंभीर जखमी झाले. त्यापैकी एका रुग्णाला पुढील उपचारासाठी पुण्याला हलविले आहे. मंगळवारी (ता.२) दुपारी तीनच्या सुमारास अपघात झाला असून दोन्ही वाहनांच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे. एस.टी चालक संजय केदार (सिन्नर आगार) यांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
यात विलास तुकाराम हाडवळे (वय ५३), सानिका विलास हाडवळे (वय १८, दोघे रा.राजुरी ता.जुन्नर), स्वाती सुभाष सहाणे (वय ६५, रा.जुन्नर), एस.टी वाहक सुखदेव नामदेव सोनावणे (वय ४९, सिन्नर जि.नाशिक), सुरेखा मलिक गोसावी (वय ५५), रूपाली संजय महागरे (वय ३८, दोघे रा.सारोळा ता.भोर), मयूर प्रकाश मोरे (वय २८ रा.नाशिक), बाजीराव लक्षमण थिगळे (वय ५४ रा.पोहे ता.खेड), सचिन मारुती लोंढे (वय ४० रा.जुन्नर), अजिंक्य परमेश्वर चवरे (वय २१ रा.लोणी राहता जि.नगर), संदीप एकनाथ खरात (चितळी-राहता) हे जखमी एसटीतून प्रवास करत होते. त्यांच्यावर मंचर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.श्वेता गोराणे, डॉ. अलकानंद रेडी, डॉ.प्रियांका चतूर, डॉ.श्रीकांत सोनूणे उपचार करत आहेत. संदीप खरात यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी वायसीएम रुग्णालय पुणे येथे पाठविले आहे.
पिकप चालक अनिल निवृत्ती औटी (वय.२४), आनंद दशरथ नाईकोडी (वय २२ दोघे रा.राजुरी ता.जुन्नर), विजय बाळशिराम जाधव (वय २६ रा.बोरी ता.जुन्नर) यांच्यावर जखमी पिकअपमधून प्रवास करत होते. त्यांच्यावर मंचर येथील सिद्धी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत, अशी माहिती डॉ. अतुल शिंदे यांनी दिली.
परिवहन महामंडळातर्फे जखमीना मदत
एकलहरे येथील जखमी ११ प्रवाशांना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी एक हजार रुपये रोख रक्कम मंचर उपजिल्हा रुग्णालयात मंचर एसटी आगार प्रमुख वसंत आरगडे, अधिकारी महेश विटे, वाहतूक नियंत्रक मोहम्मद सय्यद यांनी दिली. यापुढेही जखमी वर होणाऱ्या उपचाराचा सर्व खर्च राज्य परिवहन महामंडळातर्फे केला जाईल, असे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
Web Title: Todays Latest District Marathi News Pne22d86417 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..