ऊस मोजतोय अखेरची घटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऊस मोजतोय अखेरची घटका
ऊस मोजतोय अखेरची घटका

ऊस मोजतोय अखेरची घटका

sakal_logo
By

गुनाट, ता. ३० : येथील (ता. शिरूर) अनिल घावटे या शेतकऱ्याचा दोन एकर ऊस गेल्या दीड महिन्यापासून पाण्यातच आहे. सतत पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचराच होत नसल्याने पीक अखेरची घटका मोजत आहे.
घावटे यांनी पिकासाठी केलेला पंचवीस हजारांचा खर्च व मेहनत पाण्यात जाण्याच्या मार्गावर आहे. याच प्रकारे परिसरात असे अनेक शेतकरी बाधित असल्याने अशा पिकांचा पंचनामा होणे गरजेचे असल्याचे मत घावटे यांनी व्यक्त केले. त्यांनी जुलै महिन्यात ८६०३२ या वाणाची लागवड केली होती. शेत नांगरणे, सरी पाडणे, ऊस बियाणांवर रासायनिक प्रक्रिया करणे, बेसल डोस, लागवड, फवारण्या यावर जवळपास पंचवीस हजार रुपये खर्च केला. मात्र सातत्याने पडणारा पाऊस व त्यामुळे शेतातील पाण्याचा निचराच न झाल्याने हे ऊस पीक गेल्या दीड महिन्यांपासून पाण्यात उभे आहे. त्यामुळे उसाची वाढ खुंटने, फुटवा न होणे, मुळ्या कुजणे अशा विविध प्रकारे उसाची हानी झाली आहे. परिणामी हे पीक अखेरची घटका मोजत आहे.

सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे शेतात पाणी थांबून राहते. कितीही उपाययोजना केल्या तरी शेतातील पाण्याचा निचराच होत नाही. शासनाने अशा बाधित शेतकऱ्यांचा आढावा घेऊन आर्थिक आधारासाठी निधीची तरतूद करणे गरजेचे आहे. एक पीक वाया गेले, तर एक वर्ष वाया जाते.
-अनिल घावटे, शेतकरी, गुनाट (ता. शिरूर)

95557